हैदराबाद हादरले

हैदराबाद हे शहर आधीच वादग्रस्त झाले आहे. तेलंगणाच्या आंदोलनामुळे हैदराबाद हा वादाचा मुद्दा झाला आहे. तेलंगण हे राज्य वेगळे निर्माण केले तर हैदराबादचे काय करणार असा प्रश्न आहे आणि नव्या राज्याची निर्मिती याच शहरापाशी येऊन थांबत आहे. त्यामुळे हैदराबादेत कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते अशी शक्यता असतानाच या शहराला पुन्हा एकदा पाकिस्तानसमर्थक दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आणि भरवस्तीत दोन स्फोट घडवून काही महिन्यांच्या अंतराने या शहराला हादरा दिला.  या स्फोटांत १६ जण मारले गेले तर ११६ जण जखमी झाले.

गेल्या काही वर्षपासून आपल्या गुप्तचर यंत्रणा बळकट आणि सक्षम कराव्यात अशी मागणी होत आहे. या यंत्रणांवर करोडो रुपये खर्च होतात पण त्या नेमके काय करतात याचा कोणालाच पत्ता लागत नाही. अगदी केन्द्रीय गृहमंत्र्यांनाही कळत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात  भारतात दहशतवादी संघटना काही तरी गडबड करणार आहेत याचा सुगावा लागला असतानाही त्यांना हे स्फोट टाळण्यात यश का आले नाही ? याचा जाब त्यांना कोणी विचारणार नाही.

अजमल कसाब आणि  अफझल गुरू या दोघांना फासावर लटकावले असल्याने दहशतवादी संघटना आणि त्यांची या देशातली पिलावळ चवताळली होतीच. त्यामुळे स्फोट होऊ शकतात हे दिसतच होते. तशा धमक्याही त्यांनी दिल्या होत्या. लपून छपून नाही तर उघडपणे तसे इशारे दिले होते. या दोघांच्या फाशीचा बदला घेतला जाईल असे त्यांनी जाहीरच केले होते. फक्त भारतात त्यासाठी कोणत्या शहरात स्फोट घडवणार हे त्यांनी जाहीर केले नव्हते. ते शोधण्याचे काम तर गुप्तचर यंत्रणांचे आहे. अशा प्रकारचे स्फोट होतील हे सांगायला गुप्तचर यंत्रणा कशाला हव्यात ? ते तर त्या दोघांना फाशी दिली तेव्हाच लक्षात आले होते. तशा धमक्या देणार्यां चा पाठपुरावा करणे हे या  यंत्रणांचे काम होते. पण त्यांना ते जमले नाही. असे स्फोट होणार याचा अंदाज आला होता पण नेमके कोठे होणार हे आधी कळले नाही असे म्हणण्याची वेळ गृहमंत्र्यांवर आली.

अर्थात आपले गृहमंत्री या वेळी तरी गांभीर्याने वागले. नाही तर याही प्रसंगात त्यांना हिदुत्ववादी आतंकवाद आठवला असता. काही तरी लाईट कॉमेंट करण्याची लहर त्यांना आली नाही हे बरे झाले. आता त्यांनी तपास यंत्रणांना कामाला लावले पाहिजे. त्यांच्या पुढे जाऊन काही तरी विचार त्यांनी स्वतः करायला हवा. स्फोट होणार हे कळले होते पण नेमके कोठे होणार हे कळले नाही, तसे कळत नसते असे आय.बी.(इटंलिजन्स ब्यूरो) च्या अधिकार्यांेनी म्हटले आणि गृहमंत्र्यांनी संसदेला तसेच सांगितले. यात गृहमंत्र्यांची काय हुशारी आहे ?

असे स्फोट होतात तेव्हा आपण सर्वांनी एका तोंडाने बोलले पाहिजे, एकमेकांवर दोषारोप करून घडलेल्या स्फोटाचे गांभीर्य घालवता कामा नये, वगैरे गोष्टी खर्यार आहेत  पण तरीही आपण गुप्पचर यंत्रणांना जाब विचारणार नसू तर मग असे प्रकार कधीच थांबणार नाहीत. गृहमंत्री तसा जाब विचारीत नाहीत हे या क्षणी म्हटलेच पाहिजे. या स्फोटांच्या प्रसंगात नेहमीच एक गोष्ट आवर्जून सांगितली जात असते की या कारवाया स्थानिक लोकांच्या सहकार्याविना शक्य  नसतात. याही प्रकरणात तसेच झालेले आहे. या घटनेला  बिहारातल्या पाच स्लीपर सेल्सनी मूर्त रूप दिले असून राजू भाई नावाचा संशयित दहशतवादी यात गुंतला आहे असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या बिहारात असे स्लीपर सेल्स मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत. ते बिहारातच का निर्माण होतात असा प्रश्न आपण विचारणार नाही कारण आपल्याला हिदी भाषिक लोकांच्या विरोधात काही आंदोलन करायचे नाही पण गेल्या दोन तीन वर्षातल्या दहशतवादी घटनांच्या मागे बिहारी तरुणांचा हात आहे असे दिसलेले आहे.   

या आधी कर्नाटकातले आणि महाराष्ट्रातलेही तरुण अशा कारवायांत सापडले होते. सध्या आरोपी म्हणून न्यायालयात उभा असणारा अबु जुंदाल हा महाराष्ट्रातला आहे आणि एका कथित बनावट चकमकीच्या प्रकरणात मारली गेलेली नुसरत जहान ही तरुणीही महाराष्ट्रातलीच होती. तेव्हा या प्रकरणात आणि अशा कारवायांत प्रांत भद करण्याची काही संधी नाही. आता बिहारी तरुण अडकले असावेत असा अंदाज आहे आणि त्यादृष्टीने पोलिसांनी मधुबनी जिल्हयाकडे कूच केली आहे.

स्लीपर सेल हा प्रकार भेदायला मोठा कठिण असतो कारण त्यांनी कमालीची गुप्तता राखलेली असते. पण तरीही या लोकांनी स्फोटकांची खरेदी हैदराबादेत केली असल्याचे उघड झाले आहे. या स्फोटात आरडीएक्स वापरलेले नाही. यावरून असा तर्क केला जात आहे की या स्फोटांमागे परदेशी दहशतवादी संघटनांची फूस असली तरीही त्यांनी बाँब मात्र हैदराबादेत तयार केले आहेत. त्यात अमोनियम नायट्रेटचा वापर झाला असल्याने ही गोष्ट लक्षात आली आहे. तिच्यात जितका स्थानिक सहभाग जास्त असेल तितका या कटाचा भेद करणे सोपे जाणार आहे. अशा घरभेद्यांचा तपास करून त्यांना जबर शिक्षा घडवल्या पाहिजेत.     

Leave a Comment