बीपीओचा बिझीनेस १० टक्क्यांनी घटला

नवी दिल्ली: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय युवकांना मोठ्या प्रमाणात नोकर्‍यांची संधी मध्यंतरीच्या काळात उपलब्ध झाली होती. परंतु या क्षेत्रातील नोकर्‍या आणि व्यवसाय आता ब्राझील, चीन आणि फिलीपाईन्स या देशांनीही पळवण्यास सुरूवात केली असून त्यामुळे भारताला या क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणावर स्पर्धक निर्माण झाले आहेत.

संसदेत सादर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील बीपीओचा दहा टक्के व्यवसाय वरील तीन देशांनी पळवला आहे. भारताला चीन, ब्राझील आणि फिलिपाईन्स या खेरीज उत्तर अफ्रिका, मेक्सिको, चिली, कोलंबिया, पोलंड, आयर्लंड, या देशाकडूनही मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इंग्रजी आणि इंग्रजी भाषेचे उच्चार यामुळे चीनला माहिती तंत्रज्ञान विशषेत: बीपीओ क्षेत्रातील व्यवसायात अडथळा होता परंतु चीनने या अडचणींकडे प्रकर्षाने लक्ष देऊन आपल्या देशातील युवकांचे इंग्रजी आणि त्यांचे उच्चार सुधारण्याचे कष्ट घेण्यास प्रारंभ केला आहे. त्याचे त्यांना चांगले परिणाम मिळत असून भारतीय युवकांच्या रोजगाराला आणि व्यवसायाला त्यामुळे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

मंदीच्या काळामुळेही भारतात गेल्या आर्थिक वर्षात रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षात जेमतेम ६ लाख ९४ हजार रोजगार उपलब्ध झाले आहेत.