कामगिरीबाबत मी समाधानी- धोनी

चेन्नई: यापूर्वी मी देशाकडून कधी खेळू शकेन; याचा सुद्धा कधी विचार केला नव्हता. मी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे मला संघात स्थान मिळाले. मिळालेल्या संधीचे सोने करीत गेल्याने मला यश मिळाले. मी कांगारूविरुद्धच्या पहिल्या कसोटीत द्विशतकाबाबत कधीही विचार केला नव्हता. विजयामुळे मी खूप आनंदी असून सांघिक कामगिरीबद्दल मी समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया चेन्नई कसोटीत सामनावीर ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली.

यावेळी पत्रकारांशी त्याच्या आक्रमक खेळीबाबत बोलताना धोनी म्हणाला; तुमच्या आजूबाजूला क्षेत्ररक्षक असतील तर एक चुकीचा फटकासुद्धा आपली वाट लावू शकतो. क्षेत्ररक्षण पसरवण्यासाठी मी सुरुवातीला मोठे फटके खेळले. आघाडीच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना थकवले होते. यामुळे माझे काम सोपे झाले. त्यामुळे मला द्विशतक करून संघाच्या विजयात हातभार लावता आला.

१२ विकेट घेणा-या अश्विनची माहीने मुक्तकंठाने स्तुती केली. अश्विनच्या चेंडूत खूप विविधता होती. तो आपल्या कामगिरीत सातत्य दाखवत होता. विशेषत: त्याचे वळणारे चेंडू जबरदस्तंच होते; असे त्याने नमूद केले.

कर्णधार धोनीने त्याच्या कसोटी कारकीर्दीत दुस-यांदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला आहे. विशेष म्हणजे ही कामगिरी त्याने दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्धंच केली. यापूर्वी मोहाली येथे २००८-०२००९ मध्ये ९२ आणि नाबाद ६८ धावा काढून त्याने हा पुरस्कार मिळवला होता.