उद्धव ठाकरे राज यांच्या पाठीशी ठाकले उभे

मुंबई: अहमदनगरमध्ये मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. त्या दगडफेकीचा निषेध करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे सरसावल्याने राजकीय वर्तुळात सार्‍यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीत हिंमत असेल आणि दगड हातात घ्यायची खुमखुमी असेल तर त्यांनी सत्ता सोडून दगड हाती घेऊन दाखवावा, असे खुले आव्हान देत उद्धव ठाकरे हे राज यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार कॅम्प भागात काल राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसैनिकांची झुंबड उडाली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य केल्याने ते खळवले होते. अशातच; राज यांच्या गाडीच्या दिशेने दगडफेक झाल्याने वातावरण भलतेच पेटले.

मनसेशी आपले मतभेद असले, तरी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सत्ताधारी पक्षांकडून दगडफेक होत असेल तर त्याचा निषेध करायलाच हवा. अशावेळी मी पोलिसांना आवाहन करतो की; त्यांनी आमच्यातून बाजूला व्हावे, हल्लेखोर आणि आम्ही बघून घेऊ; असा आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या बैठकीत घेतला.

दरम्यान; याप्रकरणाचे पडसाद राज्यात विविध ठिकाणी उमटू लागले आहेत. अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांवर दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे पोस्टर्सही जाळण्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या. मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कक्षात तोडफोड झाली. यानंतर आमदार राम कदम यांना अटक करण्यात आली.

नवाब मलिक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांच्यावर आरोप केले आहेत. कदम यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांना दारू पाजली आणि राडा करण्याचे आदेश दिले. याचे फुटेज माझ्याकडे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तर गुंड निर्माण सेना असल्याचा घणाघाती आरोप नवाब मलिक यांनी केला. त्यावर; तुमच्याकडे फुटेज असेल तर ते वाहिन्यांना द्यावे, अन्यथा मी तुमच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन; असे आव्हान राम कदम यांनी मलिक यांना दिले. मी काल दिवसभऱ घरात होतो. घटना घडल्यानंतर मला पोलिसांनी ताब्यात घेतले. माझ्या घरात सीसीटीव्ही आहेत. त्याचे फुटेज मी वाहिन्यांना उपलब्ध करू देऊ शकतो; असे राम कदम म्हणाले.

दरम्यान; मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील शाब्दिक युद्ध हिंसक रूप धारण करताना दिसत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग वाशीजवळ रोखला असून, कुर्लामध्ये एक कार जाळण्यात आली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोडही केली. मुंबई पोलिस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मात्र, अद्याप एकही जणाला अटक करण्यात आलेली नाही.

Leave a Comment