पुणे: विनोदातून निखळ आनंद शोधण्याचा प्रयत्न आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण करत असतो. त्यासाठी बरेचदा विनोदी चित्रपट आवर्जून पाहिले जातात. प्रेक्षकांची हीच गरज लक्षात घेऊन मराठीत बर्याच दिवसांनी धिंगाणा घालणारा विनोदी चित्रपट येत आहे. आदित्य दाढे निर्मित, मंदार देवस्थळी दिग्दर्शित ‘धतिंग धिंगाणा’ हा फूल टू विनोदी चित्रपट येत्या १ मार्चला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.
आदित्य प्रॉडक्शन्स या बॅनरखाली प्रदर्शित होणार्या ‘धतिंग धिंगाणा’ या विनोदी मसालापटाची कथा कर्नल, त्यांची मुलगी गौरी, राहूल, निशा, देवा, लंबू गँग, बुटुकू गँग, इन्स्पेक्टर घायाळ आणि त्यांची असिस्टंट रसाळ यांच्याभोवती फिरते. यांचा खरतर एकमेकांशी तसा काहीच संबंध नाही पण, अचानक हे सगळेच एके ठिकाणी एकत्र येतात आणि सुरू होतो प्रचंड गोंधळ…धिंगाणा…
परस्परांशी काहीच संबंध नसलेल्या गोष्टी एकमेकांत अडकल्या गेल्या की कशी खूप गंमत जंमत उडते ते या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद अभय परांजपे यांनी लिहिले आहेत; तर छायाचित्रण संजय जाधव यांनी केले आहे. श्रीरंग गोडबोले आणि गुरू ठाकूर यांनी लिहिलेल्या गीतांना अजय-अतुल यांनी संगीत दिले असून अजय आणि बप्पी लाहिरी यांनी ठेका धरायला लावतील अशी गाणी गायली आहेत.
नृत्य दिग्दर्शन राजेश बिडवे यांचे; तर पार्श्वसंगीत अविनाश- विश्वजीत यांचे आहे. कला दिग्दर्शन महेश साळगांवकर यांनी केले आहे. चित्रपटात अंकुश चौधरी, प्रसाद ओक, अदिती सारंगधर, नीलम शिर्के, अतुल परचुरे, श्वेता शिंदे, दिगंबर नाईक, अरूण नलावडे, वंदना गुप्ते, उदय सबनीस, स्मिता तळवलकर, सविता मालपेकर, अभिजीत गुरू, विद्याधर जोशी, समिधा गुरू, सुनिल गोडसे, शैलेश पितंाबरे हे कलाकार धिंगाणा घालणार आहेत.
दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांचाही अभिनय या चित्रपटाच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे.