इस्टमन कलर ‘दुनियादारी’ची टीम इलेव्हन

पुणे: सध्या सोशल नेटवर्कींग साइटवर आणि सिनेवर्तुळात इस्टमन कलर लव्हस्टोरी असलेल्या ‘दुनियादारी’च्या फर्स्ट लुकची चर्चा होतेय. दिग्दर्शक संजय जाधव यांच्या आगामी ‘दुनियादारी’ची ७०-८० च्या दशकातील ही मांडणी प्रत्येकाचेच लक्ष वेधत आहे. सुहास शिरवळकर यांची ‘दुनियादारी’ ही लोकपिय कादंबरी रुपेरी पडदयावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता वाढली असून यात आता आणखी एका आकर्षणाची भर पडली आहे ती म्हणजे चित्रपटाच्या शीर्षक गीताची..

‘जिंदगी.. जिंदगी.. जिंदगी हा जिंदगी…; दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी जिंदगी…’

असे बोल असणारे चित्रपटाचे शीर्षक गीत मराठीतल्या आघाडीच्या ११ कलाकारांनी गायले आहे. सचिन पिळगांवकर, महेश मांजरेकर, सुमीत राघवन,सुनील बर्वे, प्रसाद ओक, केदार शिंदे, पंढरीनाथ कांबळी, सिध्दार्थ जाधव, वैभव मांगले, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी या अकरा दमदार अभिनेत्यांच्या आवाजात ‘दुनियादारी’तील हे गीत ध्वनीमुद्रित करण्यात आले आहे.

‘से’ बॅण्डच्या यो उर्फ सचिन पाठक यांने हे गीत लिहिले असून ‘से’ बॅण्डनेच या गीताला संगीत दिले आहे. जुन्या हिंदी गाण्याला कनेक्ट करीत मराठीत पूर्णपणे वेगळया बाजाचे गीत यानिमित्ताने तयार करण्यात आले असून हिंदी-मराठी शब्दांचा सुंदर मिलाफ यात साधला आहे. या गाण्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे या अभिनेत्यांना गायनात विशेष रुची असल्याने कोणतेही आढेवेढे न घेता आपल्या व्यस्त दिनकमातून त्यांनी वेळ देत कोणतेही मानधन न घेता सगळयांनीच हे गीत मनापासून गायलं आहे.

मराठीतील मातब्बर अभिनेत्यांना घेऊन प्रथमंच असा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाच्या या गीतांच्या वितरणाची जबाबदारी ‘व्हिडीओ पॅलेस’च्या नानुभाईंनी उचलली आहे.

संजय जाधव यांनी २० वर्षांपासून जोपासलेलं ‘दुनियादारी’चं स्वप्न त्यांच्याच ‘ड्रिमिंग टॅवेन्टी फोर सेव्हन’ या निर्मिती संस्थेद्वारे आता सेल्युलाइडवर साकारतेय. ८० च्या दशकातला कादंबरीतला काळ रेट्रो स्टाईलमध्ये मांडला असून अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, उदय सबनीस, उदय टिकेकर, सुशांत शेलार, उर्मिला कानिटकर, वर्षा उसगांवकर, सई ताम्हणकर हे कलाकार यात दिसणार आहेत.

अगदी बेल बॉटमच्या फॅशनपासून तेव्हाची केशरचना, त्यांचे संवाद ते अगदी चित्रपटाचा असणारा इस्टमन कलरची पार्श्वभूमी पेक्षकांना त्या काळात घेऊन जाणार आहे. तरुणाईला आपलीशी वाटणारी कथा, संगीत, युवा कलाकारांची फौज अशी जमून आलेली भट्टी ‘दुनियादारी’ची सफर व्दिगुणीत करेल हे नक्की!

Leave a Comment