विजय मल्ल्या न्यायालयाची यांना नोटीस

बंगळूरु: मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना बंगळूरुच्या विशेष न्यायालयाने नोटीस बजावली आहे. गाळात रुतलेल्या किंगफिशर एअरलाईन्स कंपनीने कर न भरल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

किंगफिशर कंपनीच्या २००९- १० या आर्थिक वर्षांत अंदाजे ७४ कोटी ९४ लाख रुपये आणि गेल्या आर्थिक वर्षात अंदाजे २३ कोटी ७० लाख रुपयांची थकबाकी आहे. आयकर कायद्यानुसार मल्ल्या यांनी ही थकबाकी चुकवल्यास त्यांना कमीतकमी तीन महिने आणि जास्तीत जास्त सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते.

आयकर विभागाने मंगळवारी बुडित रकमेपोटी किंगफिशर कंपनी आणि विजय मल्ल्या यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली. आयकर खात्याच्या अहवालानुसार कंपनीने आत्तापर्यंत ४०१ कोटी रुपये थकवले आहेत. त्यावर न्यायालयाने ही नोटीस बजाविली आहे.

किंगफिशर कंपनीला अंदाजे ७५५ कोटी रुपयांचा तोटा झाल्याने कंपनी बुडित निघाली आहे. त्याचप्रमाणे हवाई परवाना रद्द झाल्याने एक ऑक्टोबर २०१२ पासून किंगफिशच्या एकाही विमानाने आतापर्यंत टेकऑफ केलेले नाही.

दरम्यान, बंगळूरु विशेष न्यायालयात संबंधित प्रकरणाची पुढील सुनावणी १९ एप्रिलला होणार आहे.