भारताचे मिशन मंगळ याचवर्षी!

नवी दिल्ली: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच्या आपल्या संसदीय भाषणात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा करताना भारत यावर्षी आपले पहिले मिशन मंगळ फत्ते करणार असल्याचे जाहीर केले आहे.

यावर्षी बर्‍याच अंतराळ मोहिमांची आखणी करण्यात आलेली आहे. यात मंगळावरील मोहिमेचा सुद्धा समावेश असून मार्गदर्शक उपग्रहाचे सुद्धा क्षेपण होणार आहे असे राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सांगितले. भारतीय अंतराळ संशोधन केंद्र, इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम (आयआरएनएसएस) च्या ७ उपग्रहांपैकी एक उपग्रह अवकाशात सोडणार आहे. ही सिस्टीम भारताच्या जागतिक संस्थापन प्रणालीचे एक रूप आहे. मंगळावरील मोहीम ही ऑक्टोबर महिन्यात हाती घेण्यात येणार आहे.

मंगळावरील जीवावशेष आणि तेथील वातावरणाचा झालेला र्‍हास यावर संशोधन करण्यात येईल असेही राष्ट्रपती म्हणाले. या मोहिमेअंतर्गत भारत, पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकलच्या साहाय्याने अंतराळात एक यान सोडणार आहे. ही मंगळ मोहीम ३०० दिवसांची असून त्यानंतर २०१४ च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत मंगळाच्या कक्षेत प्रवेश घेईल. या मोहिमेचा आपल्या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी मोठा उपयोग होणार आहे, असे मुखर्जी म्हणतात.