लादेनही म्हणतो;’वृक्षवल्ली आम्हा सोयरे’

टिंबक्टु: ‘वृक्ष हे आपले मित्र आहेत. वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन केल्यास ते आपल्याला सुरक्षा प्रदान करतात. वृक्ष आपल्याला सुरक्षितपणे वावरण्याचे स्वातंत्र्य बहाल करतात;’ हे उद्गार कोणा वृक्षमित्राचे किंवा पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्याचे नाहीत. विकास प्रकल्पात अडथळा आणणार्‍या पर्यावरणवाद्यांना अनेकदा अतिरेकी म्हणून संबोधले जाते. आपल्या स्वार्थासाठी का होईना; वृक्षांची उपयुक्तता व्यक्त करणारे हे उद्गार आहेत जागतिक दहशतवादाचा पोशिंदा असलेल्या क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन याचे!

या उद्गाराची आठवण येण्याचे कारण असे की; दहशतवादविरोधी लढ्यातील प्रभावी अस्त्र ठरलेल्या ‘ड्रोन’ हल्ल्यांपासून बचाव कसा करावा यासंबंधीची अल कैदाची एक मार्गदर्शक पत्रिका आफ्रिकेतील माली या देशात सापडली आहे. या पत्रिकेत नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर आपल्या बचावासाठी करण्याचे २२ मार्ग दाखविण्यात आले आहेत आणि मालीसह जगभरातील दहशतवादी त्याचा उपयोग करीत आहेत. ही पत्रिका दहशतवाद्यांच्या वेबसाईटवर दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली. त्याची एक प्रत असोसिएटेड प्रेसला नुकतीच मिळाली.

आंब्याच्या मोठ्या वृक्षांच्या छायेत आपली वाहने लपविण्याचे तंत्र माली येथील दहशतवादी गट अनेक वर्षापासून अमलात आणत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. मार्गदर्शक पत्रिकेत १० आणि १३ व्या क्रमांकावर हा उपाय सांगण्यात आला आहे. मोठ्या वृक्षांच्या सावलीत असलेली वाहने टिपणे मानवविरहीत विमानांना कठीण जाते.

त्याच प्रमाणे हल्ली दहशतवादी बांबू किंवा तत्सम गवती प्रकारच्या वनस्पतींपासून बनविलेले तट्टे किंवा चटया भरमसाठ किंमत देऊन खरेदी करीत असल्याने ते बनविणार्‍या कारागिरांची चालती आहे. एका तट्ट्या किंवा चटईसाठी दहशतवादी तब्बल दीड डॉलर मोजायला तयार असतात. या चटया वाहनांच्या टपावर बांधल्या तर हवेतील ड्रोन विमानांना त्या जमिनीवर अंथरल्यासारख्या दिसतात आणि वाहनांचा बचाव होतो. काही इन्फ्रारेड सेन्सर्स नुकत्याच थांबविलेल्या वाहनांच्या गरम इंजिनमुळे आसपासची गरम झालेली हवा ओळखून वाहनाचा ठावठिकाणा घेऊ शकतात. तट्टे किंवा चटया उष्णतारोधी असल्याने त्या अशा सेन्सर्सना चकवू शकतात. ड्रोन विमानांची दिशाभूल करण्यासाठी ठराविक ठिकाणी मानवी आकार आणि पेहेरावाचे पुतळे आणि बाहुले यांचा जमाव करून ठेवण्याची क्लृप्तीही दहशतवादी वापरतात.

माली येथील दहशतवाद्यांचा वाहने लपविण्याचा आणखी एक मार्ग ‘अभिनवं’च मानावा लागेल. माती आणि साखरेच्या मिश्रणात पाणी कळवून बनलेला चिकट चिखल हे दहशतवादी आपल्या वाहनांवर थापतात.यामुळे त्या वाहनांचे ड्रोनपासून संरक्षण होते.

टिंबक्टु येथे सापडलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचा लेखक अब्दुल्ला बिन मोहम्मद हा येमेन येथील दहशतवादी गटाचा महत्वाचा म्होरक्या आहे. यावरून दहशतवादी गटांचे ‘आंतरखंडीय’ सहकार्य दिसून येते. ड्रोन हल्ल्याबाबत त्यांची सतर्कताही यावरून दिसून येते. अरेबिक आणि इंग्रजी भाषेत काढण्यात आलेल्या या पत्रिकेचा प्रसार येमेनसह पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि उत्तर आफ्रिकेतील ‘ड्रोनबाधित’ देशात कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांमध्ये करण्यात आला आहे.

Leave a Comment