राजधानीत विदेशी महिलेसह दोघींवर अत्याचाराच्या घटना

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमध्ये एका विदेशी महिलेवरील बलात्काराचे नवे प्रकरण समोर आले आहे. गुडगावमधील एका कंपनीत काम करणार्‍या पीडीत महिलेने मित्रावर बलात्काराचा आरोप केला आहे. हौजखास पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटकही केली आहे.

चीनची २३ वर्षीय पीडीत महिला गुडगाव येथील एका कंपनीत काम करते. सोमवारी रात्री तिचा मित्र तारिक शेख याने तिला मालवीय नगर येथील एका पार्टीत नेले. नंतर तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आपल्या मित्राच्या घरी नेले. तिथे तिला बळजबरीने दारू पाजण्यात आली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला, असे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तारिकच्या घरी छापा टाकल्यानंतर तो फरार होण्यास यशस्वी झाला होता. मात्र, नंतर पोलिसांनी मोबाईलच्या लोकेशनवरून त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी याची माहिती चिनी दूतावासालाही दिली आहे.

दुसर्‍या एका घटनेत २४ वर्षीय युवती तिच्या ओळखीच्या मोहोम्मद शकील नामक व्यक्तीला भेटण्यासाठी बुधवारी संध्याकाळी स्वरूप नगर या ठिकाणी आली असता या नराधमाने त्याच्या मोहोम्मद इर्शाद, मोहोम्मद अबीद आणि लजपतराय सचदेव या मित्रांसह तिला जवळच्या उत्तराखंड कॉलनीत नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

त्यानंतर तिला एका घेऊन कारमधून हे आरोपी बुरारीकडे निघाले असता पोलिसांच्या गस्ती वाहनाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्यांच्या कारच्या काचांना काळे कागद असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना जेरबंद केले आणि पीडीत युवतीची सुटका केली.