नवी दिल्ली – पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) जोरदार राडा सुरू झाला आहे. भाजपच्या कही नेत्यांकडून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा धोशा लावला गेल्यानंतर बिथरलेल्या संयुक्त जनता दलाने नितीश कुमार यांचे घोडे पुढे दामटले आहे.
जनता दल (यु)चे नेते व बिहार योजना आयोगाचे उपाध्यक्ष हरीकिशोर सिंह यांनी गुरुवारी दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सिंह यांनी नीतिश कुमार हे पंतप्रधानपदाशी सर्वाधिक योग्य उमेदवार असल्याचे सांगितले.
निवडणुकीआधी एनडीएने पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यास आघाडीत फूट पडेल; असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आधी ऩिवडणूक जिंकण्याला प्राधान्य द्यायला हवे. त्यानंतरच उमेदवार घोषित करायला हवा, असेही ते म्हणाले. मात्र हरीकिशोर सिंह यांनी व्यक्त केलेल्या मतांशी पक्षाचा संबंध नाही. ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे; असे जनता दलातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
असे असले तरी मोदी यांच्या मार्गात अडथळे आणण्यासाठीच जदयुने नीतिश कुमारांना चर्चेत आणल्याचे बोलले जात आहे.