प्रक्षोभक भाषणासाठी तोगडीयांवर गुन्हा दाखल

मुंबई: प्रक्षोभक आणि द्वेषपूर्ण भाषणाबद्दल विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडीया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाषणाची तपासणी करून त्यात विशिष्ट वर्गाविषयी द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक मजकूर आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा; असे आदेश केंद्रीय गृह विभागाने राज्य शासनाला गुरुवारी दुपारी दिले. त्यानंतर तातडीने पावले उचलून ही कारवाई करण्यात आली.

तोगडीया यांनी मागील महिन्यात नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे जाहीर भाषणात मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनचे आमदार अकबरुद्दिन ओवेसी यांच्याबद्दल द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे.

तोगडीया यांच्या भाषणाचे ध्वनिमुद्रण तपासणीसाठी फोरेन्सिक विभागाकडे रवाना करण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात येईल आणि आवश्यकता वाटल्यास त्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची मदत घेण्यात येईल; असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.