उड्डाण पूल कोसळला: तीन जण ठार

मुंबई: बांधकाम सुरू असलेल्या उड्डाण पुलाचा काही भाग कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला तर किमान तिघे गंभीर जखमी आहेत. ढिगार्‍याखाली आणखी काही जण अडकले असल्याची शक्यता आहे.

सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी उभारला जात असलेल्या उड्डाण पुलाचा काही भाग बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोसळला. पुलाचे दोन भाग सिमेंट स्लॅबने जोडण्याचे काम सुरू असताना एका मशीनचे लॉक तुटून स्लॅब कोसळला आणि ही दुर्घटना घडली. या स्लॅबच्या ढिगार्‍याखाली अनेक जण गाडले गेले. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत तीन मजूर मृत्युमुखी पडले.

सुमारे २ किलोमीटर लांबीचा हा पूल तब्बल २८७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत होता. पुलाचे बांधकाम वेळेत न झाल्यामुळे २ वेळा या कामाची मुदत वाढवावी लागली. या घाई गडबडॆमुळेच बांधकामाच्या दर्जावर परिणाम होऊन हा अपघात घडल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. रस्त्याच्या ज्या भागावरून हा उड्डाण पूल बांधला जात होता; त्या ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक नगण्य असल्यानेच मोठी जीवितहानी टळल्याचेही त्यांनी सांगितले.

या पुलाचे काम करणार्‍या लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या तीन कर्मचार्‍यांवर मुंबई पोलिसांनी हरगर्जीपणाने मृत्यू आणि गंभीर दुखापतीला कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हे दाखल करून अटक केली.