राज, उद्धव एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चेला उधाण

मुंबई: शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सत्तेची टाळी वाजविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर हात पुढे करून सज्ज असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र ‘वेळ आल्यावर बोलेन;’ असे सांगून वेळ मारून नेली. या दोन्ही पक्षांच्या युतीबाबत दोन्ही पक्षप्रमुख आता शांत असले तरी इतर पक्षातंच गुरुवारी याबाबत क्रिया- प्रतिक्रियांची रणधुमाळी उडताना दिसली.

केंद्रात राहून राज्याचे राजकारण चालविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या संभाव्य बहुचर्चित युतीबाबत अतिशय थंड आणि निर्विकार प्रतिक्रिया व्यक्त केली. राज-उद्धव एकत्र आल्यास त्याचा कोणताही परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार नाही वा कोणतीही सत्ता समीकरण बदलणार नाही, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस, राष्ट्रवादीशी २० वर्ष केलेल्या संसारापसून काडीमोड घेणारे आणि भाजप, शिवसेनेशी महायुती करून सन२०१४ मध्ये विधानसभेवर भगव्याच्या जोडीने निळा झेंडा फडकविण्याच्या तयारीत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले मात्र या नव्या सोयरिकीच्या शक्यतेने बिथरले आहेत. मनसेला बरोबर घेतल्यास महायुतीत सहभागी होण्याबाबत पुनर्विचार करण्याचा इशारा त्यांनी बुधवारीच दिला.

सुरुवातीपासून मनसेला युतीत सहभागी करून घेण्याचे मत असलेले भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे त्यांच्या प्रयत्नांना यश येण्याच्या शक्यतेने सुखवले आहेतंच. भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजनाथ सिंह यांनीही ही संभाव्य युती फायद्याची ठरेल; असे मत व्यक्त केले.

आतापर्यंत राजकीय आखाड्यात आरोप, प्रत्यारोपांची धुळवड खेळण्यात गर्क असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील कटुता दूर करण्याच्या दृष्टीने शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. आमच्याबरोबर येण्याची ज्यांची प्रामाणिक इच्छा असेल त्या सर्वांचे आम्ही स्वागत करू. याला मनसेचाही अपवाद नाही; असे उद्धव यांनी बुधवारी स्पष्ट केले.

Leave a Comment