पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चेवर पवारांनी तूर्त तरी टाकला पडदा

नवी दिल्ली: आता पुन्हा संसदेत येण्याची माझी इच्छा नाही, असे सांगत राजधानीतील पत्रकारांशी बोलताना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान पदावरील आपल्या दावेदारीचा मुद्दा सध्या तरी निकालात कढला आहे. पवार यांनी याआधीच येणार्‍या लोकसभा निवडणूका न लढण्याचे संकेत दिलेले आहेत.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी शरद पवार हेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे विधान नुकतेच केले होते. पवार यांनी मात्र या विधानाशी विसंगत भूमिका मांडली. पंतप्रधानपद भूषविण्याची पवारांची दीर्घ काळापासून इच्छा आहे; हे खुद्द पवारांनी व त्यांच्या पक्षाने कधीही नाकारले नाही.

पवारांनी हे पद पटकावण्यासाठी अगदी १९९१ पासून प्रयत्न केला आहे. मात्र, त्यात त्यांना मागील २२ वर्षे यश आले नाही. काँग्रेस पक्ष आपल्याला पंतप्रधानपदी कधीही विराजमान होऊ देणार नाही हे लक्षात येताच त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा काढत काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसची १९९८ मध्ये स्थापना केली. मात्र, त्यानंतर देशात वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांनी आपापली आघाडीची सरकारे व्यवस्थित चालवली व देशाला राजकीय स्थैर्य दिले.

राहुल गांधी यांच्याकडे युपीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पाहिले जात असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, सध्या तरी राहुल यांच्या पंतप्रधानपदाचा कोणताही मुद्दा नाही. वेळ आल्यानंतर त्याबाबत बोलू. राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर त्यांनी एका प्रश्नावर दिले.

गडकरी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नसण्याचा निश्चतच आम्हाला विदर्भात फायदा होईल असे सांगताना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीत आपण केणताही अडथळा आणणार नाही, असेही ते म्हणाले. तेलंगणा राज्याची मागणी रास्त असल्याचे सांगत त्यांनी लवकरात लवकर हे नवे राज्य स्थापन केले जावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment