वॉशिग्टन दि.३० – मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिकन कोर्टाने मास्टरमाईंड डेव्हीड हेडलीला ३५ वर्षांचा तुरूंगवास सुनावला आहे. मात्र या हल्ल्याचा सूत्रधार हफिझ सईद अजून मोकळाच असल्याने या हल्ल्याचा न्याय हा अनफिनिश्ड बिझिनेस असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी मंगळवारी ग्लोबल टाऊनहॉल येथे बोलताना सांगितले.
हिलरी आता त्यांच्या पदावरून निवृत्त होत आहेत. त्या म्हणाल्या की मी निवृत्त होत असले तरी भारतीयांना सांगू इच्छीते की या हल्ल्याचा पूरेपूर न्याय मिळालेला नाही याची आम्हाला जाणीव आहे आणि तो मिळवून देणे आम्ही जबाबदारी मानतो. आजपर्यंत अमेरिकेने अनेक क्रूर व धोकादायक दहशतवाद्यांना पकडले आहे व ठारही केले आहे. पाकिस्तान हा त्यांच्यासाठी सेफ हेवन आहे. त्यामुळे आम्ही पाक सरकारला वारंवार सांगतो आहोत की हे दहशतवादी त्यांच्या देशात आसरा घेत आहेत ते त्यांनाच एक दिवस डोकेदुखी ठरणार आहेत आणि त्यावेळी पाक सरकारलाच त्यांच्याशी डील करावे लागेल.
या दहशतवाद्यांचा उपद्रव भारत, अफगाणिस्तान, अमेरिकेप्रमाणेच जगातील अन्य देशांनाही होत आहे. मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हफिज सईद अजूनही पाकिस्तानात मुक्त फिरतो आहे. त्याला तीन वेळा अटक होऊनही पुरेशा पुराव्या अभावी न्यायालयांनी त्यांची मुक्तता केली आहे. त्याच्यावर कारवाई होणे हे अत्यंत गरजेचे आहे.
हिलरी यांच्या विधानानंतर भारताचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तातडीने मुंबई हल्ल्याच्या मुख्य सूत्रधार हफीज सईदला व त्याच्या अन्य साथीदारांना भारताच्या ताब्यात द्यावे यासाठी भारताने नेहमीच इस्मामाबाद कडे आग्रह धरला असल्याचा खुलासा केला आहे.
भारताचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही भारताला पुरेसा न्याय मिळाला नसल्याच्या क्लिंटन यांच्या विधानाशी सहमती दर्शविली आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर ए तैय्यबाचा संस्थापक म्होरक्या हाफीज सईद याच्यासह २६/११ हल्ल्यातील सर्व आरोपींचा ताबा भारताला मिळावा; अशी आग्रही मागणी पाकिस्तानकडे केली आहे.