पुण्यात हायफाय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे दि.३०- पुण्याच्या कोरेगांव पार्क भागात उच्चभ्रू वस्तीत चालविल्या जात असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस दलाला यश आले असून यावेळी घालण्यात आलेल्या धाडीत १२ मुलींची सुटका करण्यात आली आहे. या सर्व मुली १९ ते २५ वयोगटातील असून त्यातील सात जणी बांग्लादेशच्या , १ उझबेकिस्तानची तर अन्य तीन भारतीय आहेत. हे रॅकेट चालविणार्या  पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना सामाजिक सुरक्षा पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे म्हणाले की सोमवारी पोलिसांना मनसेचे नगरसेवक बाबू वागसकर यांनी कोरेगांव पार्कमधील सात नंबरच्या लेनमधील एका डुप्लेकस अपार्टमेंटमध्ये अवैध वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी डमी ग्राहक येथे पाठविला आणि वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटल्यांनंतर तेथे सोमवारी रात्रीच धाड घातली. त्यात पाच जणांना अटक करण्यात आली असून रामदेव यादव, इस्माईल कौसर, व्यंकटेश राव, योगेश पवार आणि महादेव मुसळे अशी त्यांची नांवे आहेत. या सर्वांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर न्यायाधीशानी त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे

बर्गे यांनी असेही सांगितले की इस्माईल कौसर हा हिस्टरी शीटर असून त्याला यापूर्वीही याच गुन्हयासाठी अटक केली गेली होती. देशाच्या विविध भागात राहणारे हे पाच जण एकत्र कसे आले याचा तपास सुरू आहे. सोडविलेल्या मुलींमधील उझबेकिस्तानच्या मुलीला यापूर्वीही बंगलोर येथे पकडण्यात आले होते. ती हिंदी भाषा सराईतपणे बोलते याचाच अर्थ ती बराच काळ भारतात राहात असावी. सात बांग्लादेशी मुलींपैकी एकीकडे भारताचे मतदान ओळखपत्रही मिळाले असून ते कलकत्त्यातून देण्यात आले आहे.. सोडविण्यात आलेल्या सर्व मुलींना एनजीओमध्ये ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment