महाराष्ट्रद्वेषानेच पडला गडकरींचा गड: राज ठाकरे

मुंबई: सर्वच पक्षातील उत्तर भारतीय नेत्यांना महाराष्ट्राचे वावडे असल्याने भारतीय जनता पक्षातील घरभेद्यांनी सत्ताधार्यांशी हातमिळवणी करून नितीन गडकरी यांना पुन्हा पक्षाध्यक्षपद मिळू दिले नाही; असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

सोमवारपर्यंत भाजपच्या अध्यक्षपदी गडकरी यांना संधी मिळणार हे निश्चित होते. मात्र मंगळवारी गडकरी यांच्याशी संबंधित पूर्ती उद्योग समूहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आणि गडकरींच्या विरोधकांनी जोमाने डोके वर काढले. अखेर गडकरी यांची दुसऱ्यांदा पक्षाध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी हुकली.

उत्तरेतील कोणत्याच नेत्यांना मराठी नेते नको असतात. त्याचप्रमाणे गडकरी त्यांना नको होते. त्यामुळे भाजपमधील उत्तरेच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षांशी संगनमत करून आयकर विभागाचे छापे घडवून आणले; असा आरोप राज ठाकरे यांनी केला.