भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचा काँग्रेसवर हल्लाबोल

नवी दिल्ली: देशाची सध्या हलाखीची परिस्थिती झाली असून त्याला सर्वस्वी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केला. भगवा दहशतवाद पोसत असल्याबद्दल भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते गुरुवारपासून देशभर निदर्शने करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

मावळते पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांची अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड निश्चित मानली जात होती. संघाचा ठाम पाठींबा गडकरींना होता. इतर कोणत्याही नावावर सहमती होत नसल्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी नाईलाजाने का होईना; गडकरींच्या नावाला पसंती दिली. मंगळवारी गडकरींच्या विरोधात वेगाने सूत्र फिरण्यास सुरुवात झाली. त्यातच पूर्ती उद्योग समूहातील कथित आर्थिक गैरव्यवहारांचे आणि आयकर चुकवेगिरीचे सावट आयकर विभागाच्या चौकशीने अधिक गडद झाले.

भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने गडकरींना पुन्हा अध्यक्षपद देऊ नये; अशी अडवाणींसह पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका होती. त्यात आघाडीवर असलेल्या यशवंत सिन्हा यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज आणि मतदार यादी घेतली. गडकरींची पक्षपरंपरेनुसार बिनविरोध निवड होणार नाही हे स्पष्ट झाले. इतर कोणी उमेदवार उभा न राहिल्यास गडकरींना विरोध करण्यासाठी आपण प्रतीकात्मक निवडणूक लढवू असे ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी आधीच जाहीर केले होते. गडकरी विरोधकांनी अडवानी यांना साकडे घातले.

इकडे मंगळवारी रात्रीपर्यंत गडकरी यांनी संघाचे वरिष्ठ अधिकारी भैय्याजी जोशी यांच्या मदतीने विरोध शमविण्याचा प्रयत्न केला. अडवाणी यांनीही विरोधकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गडकरी विरोधक आपल्या विरोधावर ठाम राहिले. अखेर रात्री उशीरा गडकरी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्या पदाची माळ संघाशी घट्ट नाळ असलेले आणि भाजपतही प्रभाव असलेले अनुभवी नेते राजनाथ सिंह यांच्या गळ्यात पडली.

राजनाथ सिंह यांनी बुधवारी सकाळी अडवाणी आणि गडकरी यांची भेट घेतली. शिंदे यांच्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्षांनी सुरुवातीपासूनंच आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याचा निर्धार राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

Leave a Comment