पुणे दि. २१ – कराटे, किक बॉक्सिंग, मार्शल आर्ट व अन्य स्वसंरक्षणासाठी उपयुक्त पडणारे प्रशिक्षण देणार्यां संस्थात गेल्या माहिन्याभरात पुण्यातील तरुणींची आणि गृहिणींची गर्दी वाढत चालली असल्याचा अनुभव संस्थाचालक घेत आहेत. दररोज या संबंधी चौकशी करणारे किमान १५ ते २० फोन या संस्थांकडे येत असून गेल्या महिन्याभरात अशा संस्थातून किमान १५ नवीन नोंदण्या झाल्या आहेत असे समजते.
दिल्ली गँगरेप प्रकरणानंतर आता महिला मुली स्वसंरक्षाबाबत अधिक जागरूक झाल्याचा अनुभव पुण्यात येत आहे. बरेच पालकही आपल्या तरूण मुलींसाठी अशा कोर्सची चौकशी करत आहेत असे अरविंद मोरे यांनी सांगितले. मोरे यांचे निगडी प्राधिकरणात कराटे आणि मार्शल आर्टचे प्रशिक्षण केंद्र असून ते स्वतःच हे प्रशिक्षण देतात. ते म्हणाले अशा कोर्सला मुली येतात मात्र शक्यतो सुट्ट्या बघून मगच प्रवेश घेतले जातात असा आजवरचा अनुभव होता. गेल्या महिन्यात मात्र प्रथमच मोठ्या संख्येने मुलींनी नोंदणी केली आहेच पण गृहिणींनीही या कोर्ससाठी प्रवेश घेतले आहेत. मोरे चार दिवसांचा विशेष कॅम्प गृहिणी, शालेय विद्यार्थीनी आणि कॉलेज विद्यार्थीनींसाठी घेणार आहेत.
आजकाल शाळेपासून अगदी नोकर्याप करणार्याी गृहिणींना एकटयाने प्रवास करावे लागतात तसेच वेळीअवेळी पायीही जावे लागते अशावेळी रस्त्यात अथवा वाहनांतही छेडछाडीच्या घटना घडतात . मात्र आता या विरोधात आपणच आपली तयारी केली पाहिजे याची जाणीव महिलावर्गाला झाली आहे. त्यातूनच सेंट मीराज कॉलेजमध्येही स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणारे कोर्स सुरू करण्यात आले असून त्याला विद्यार्थीनींकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे असे कॉलेज व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. या कोर्सला ५० विद्यार्थींनींनी प्रवेश घेतला आहे असे समजते.
ओमर तांबोळी हे मार्शल आर्टचे प्रशिक्षण देतात. त्यांचे कोर्सेच काळेवाडी येथे असून गेल्या महिन्याभरात अनेक गृहिणींनी या कोर्ससाठी नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले. कराटे प्रशिक्षण देणारे रूपेश परदेशी यांनीही दिल्ली घटनेनंतर या कोर्सला येणार्याि मुली महिलांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे व त्यासाठी जादा बॅच आणि जादा प्रशिक्षकही नेमल्याचे सांगितले.
हे कोर्स करणार्याय युवतींच्या मते आम्ही हे शिक्षण घेत आहोत ते ऐनवेळी आम्ही प्रत्यक्षात वापरू शकू की नाही हे आम्हाला आत्ताच सांगता येणार नाही. मात्र हे प्रशिक्षण घेतल्याने आमचा आत्मविश्वास मात्र नक्कीच वाढला आहे असे सांगितले.