पुणे दि.२१ – महाराष्ट्रात आणि देशाच्या बर्या च भागात दुष्काळसदृश स्थिती असली तरीही यंदा देशात साखरेचे ६५ लाख टन जादा उत्पादन अपेक्षित असल्याने देशात व महाराष्ट्रात साखरेचे दर स्थिर राहतील असे साखर संकुलचे अध्यक्ष विजयसिंग मोहिते पाटील यांनी सांगितले.
मोहिते म्हणाले यंदा देशात मे अखेर २४९ लाख टन साखर उत्पादन होत आहे. गेली दोन वर्षे साखर कारखान्यांना गळीत हंगाम अतिशय चांगले गेले आहेत. त्यामुळे देशात साखरेचे बफर स्टॉक मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय देशाची गरज भागूनही ६५ लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. महाराष्ट्रातही गरज भागून १४ लाख टन साखर जादा उत्पादन होत आहे. त्यामुळे महागाई वाढली असली तरी साखरेचे दर स्थिर राहतील.
महाराष्ट्राच्या ऊस ऊत्पादित भागाला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला यंदा दुष्काळाचा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा राज्यात साखरचे उत्पादन गतवर्षीच्या ८९ लाख टनाच्या तुलनेत घटले आहे. आत्तापर्यंत कारखान्यांनी ५४५ लाख टन उसाचे गाळप केले आहे आणि ७० लाख टन साखर उत्पादन केले आहे. मात्र उसाला दुष्काळामुळे पुरेसे पाणी न मिळाल्याने उसातील साखरेचे प्रमाण घटले आहे त्यामुळे कारखान्यांना उतारा कमी मिळतो आहे. परिणामी कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे असेही मोहिते यांनी सांगितले.