लखनौ दि.२१ – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग हे आज भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करत असून आज लखनौ येथे होत असलेल्या अटल शंखनाद रॅलीत ते आपल्या जनक्रांती पार्टीचे भाजपत विलीनीकरण करणार आहेत. या कार्यक्रमातच ही घोषणा केली जात आहे. या निमित्ताने राज्यातील सर्व वरीष्ठ भाजप नेतेही एकाच व्यासपीठावर येत आहेत.
कल्याणसिंगांचे पुनरागमन आणि त्यांच्या पार्टीचे भाजपत विलीनीकरण म्हणजे भाजपने आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले असल्याचे चिन्ह मानले जात आहे. आजच्या कार्यक्रमात अटलबिहारींच्या काळातील गुड गव्हर्नन्सचाच हवाला नागरिकांना दिला जाणार असून आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ता मिळाली तर पुन्हा एकदा देशाचा कारभार व्यवस्थित आणि सुरळीत चालविण्याचे आश्वासन जनतेला दिले जाणार आहे असेही समजते. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, माजी अध्यक्ष मुरली मनोहर जोशी, राजनाथसिंग, उपध्यक्ष कलराज मिश्रा विनय कटियार आणि राष्ट्रीय सचिव वरूण गांधी आणि उमाभारती यांची यावेळी भाषणे होत आहेत.
याच कार्यक्रमात गडकरी यांच्या हस्ते कर्मचारी, नागरिकांसाठी टोल फ्री हेल्पलाईन लाँच केली जात आहे. सभेला किमान ५० हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील असा अंदाज कलराज मिश्रा यांनी वर्तविला आहे.