
हिस्सार: हरियाणामध्ये किशोरवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून त्याचे चित्रण मोबाईल फोनवरून वितरित केल्याच्या आरोपावरून हिस्सार पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

हिस्सार: हरियाणामध्ये किशोरवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून त्याचे चित्रण मोबाईल फोनवरून वितरित केल्याच्या आरोपावरून हिस्सार पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
खेडेगावात राहणार्या आणि दहावीत शिकणार्या १८ वर्षीय युवतीला तिच्याच गावातील तिघा जणांनी शेताजवळून येताना चाकूचा धाक दाखविला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यावेळी त्यांनी मोबाईल फोनवरून चित्रण केले. हे चित्रण त्यांनी एमएमएसद्वारे वितरीत केले. ही घटना दोन महिन्यापूर्वी घडली. याबाबत कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही या गावगुंडांनी या युवतीला दिली.
काही दिवसापूर्वी याच गावातील आणखी एकाने या युवतीला गाठले आणि तिच्यावरील बलात्काराचे चित्रण तिला दाखवून तिच्यावर बलात्कार केला. रविवारी आणखी एकाने याच प्रकारची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला जबरदस्तीने आपल्या घरात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ही युवती त्याच्या तावडीतून सुटून घरी आली आणि तिने आपल्या कुटुंबियांना या प्रकारची माहिती दिली. त्यांनी बरवाला पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या युवतीची वैद्यकीय चाचणी करून पोलिसांनी ६ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यापैकी ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.