वनडे क्रमवारीत टीम इंडिया अव्वलस्थानी

रांची येथे झालेल्या तिसर्‍या लढतीत इंग्लंडला सात गड्यांनी पराभूत करत टीम इंडियाने आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर वनच्या सिंहासनावर ताबा मिळवला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तीन वर्षे चार महिन्यांनंतर पुन्हा अव्वल स्थान गाठले आहे. या मालिकेत टीम इंडियाला इंग्लंडला पराभूत करून अव्वल स्थान काबीज करण्याची संधी होती. यापुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवला तरच हे अव्वलस्थान टिकवता येणार आहे.

सप्टेंबर २००९ मध्ये श्रीलंकेत झालेल्या तिरंगी मालिकेदरम्यान भारतीय संघ २४ तासांसाठी नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झाला होता. शनिवारी रांची येथील विजयानंतर भारताचे ११९ गुण झाले आहेत. इंग्लंड टीम ११८ गुणांसह दुसर्‍या स्थानी घसरला आहे. त्यानंतर या क्रमवारीत द. आफ्रिका ११६ गुणांसह तिस-या क्रमांकावर आहे. त्यांनतर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ १११ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत . त्यानंतर पाचव्या स्थानावर पाकिस्तान १०७ गुणांसह आहे. सहाव्या स्थानावर वेस्ट इंडिज ८८ गुणासह आहे. त्यानंतर या क्रमवारीत बांगलादेश, न्यूझीलंड व झिम्बाब्वेचा नंबर लागतो.

दरम्यान, बीसीसीआयने इंग्लंडविरुद्ध होणार्‍या अखेरच्या दोन वनडेसाठी टीम इंडियात कोणताच बदल केलेला नाही. सुमार कामगिरीनंतरही अजिंक्य रहाणेला संघात कायम ठेवले आहे. यामुळे वीरेंद्र सेहवागला संधी मिळाली नाही. टीम इंडिया आता मोहालीत चौथा वनडे २३ जानेवारी रोजी आणि धर्मशाला येथे पाचवा वनडे २७ जानेवारीला खेळेल. सलगपणे सुमार कामगिरीमुळे इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतून सेहवागला वगळण्यात आले होते.

Leave a Comment