पुणे दि.१४- पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने श्रीरामपूर येथून प्रमुख संशयित बंटी जहागिरदार याला रविवारी अटक केली असून आज सकाळीच त्याला मोक्का न्यायालयात हजर करण्यात येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बंटी हा श्रीरामपूरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा मुलगा असून तो स्वतःही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे असे समजते.
खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बंटीवर दहशतवाद विरोधी पथकाचा पहिल्यापासूनच संशय होता व त्याच्यावर पाळतही ठेवण्यात आली होती. या बॉम्बस्फोटप्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या सात जणांपैकी इम्रान याला बंटीने दोन शस्त्रे पुरविल्याचेही तपासात निष्पन्न झाले होते. तेव्हापासूनच बंटीवर पोलिसांची नजर होती. यापूर्वीही २००९ साली लष्कराची गोपनीय माहिती चोरल्याप्रकरणी बंटीला मालेगांव येथून अटक करण्यात आली होती पण तो जामीनावर सुटला होता.
बंटी यापूर्वी काँग्रेसचा कार्यकर्ता होता नंतर त्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता असेही समजते. बंटीला मोक्का न्यायालयात हजर करण्यात येत आहे.