अलाहाबाद दि. १४ – यंदाच्या वर्षात अलाहाबाद येथे होत असलेल्या पूर्ण कुंभमेळ्याच्या काळात किमान १० कोटी भाविक अलाहाबाद येथे हजेरी लावतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १४४ वर्षांनंतर अलाहाबाद येथे पूर्ण कुंभमेळा होत असून त्याची सुरवात सोमवारी झाली. हा मेळा महाशिवरात्रीपर्यंत म्हणजे १० मार्चपर्यंत चालणार असून उद्या म्हणजे मंगळवार पासून विविध आखाड्याच्या साधूसंतांच्या शाही स्नानाची धामधूम सुरू होणार आहे. उद्या पहाटे साडेपाच च्या सुमारास पहिले शाही स्नान होणार आहे. आज दिवसभरात सुमारे १ कोटी भाविक त्रिवेणी संगम स्नान करतील असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
जगभरात सर्वाधिक संख्येने लोक एकत्र येण्याचा विक्रम २००१ साली हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यात नोंदविला गेला होता. या कुंभमेळ्यात सुमारे साडेचार कोटी भाविकांनी स्नानाची पर्वणी साधली होती. यंदाचा अलाहाबादचा कुंभमेळा पूर्णकुंभ असल्याने १० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. त्यात लाखाहून अधिक परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा, श्रीश्रीश्री रविशंकर, बाबा रामदेव, आसाराम बापू आदि मान्यवरही कुंभमेळ्यात सहभागी होणार असून या मेळ्यात दहशतवाद्यांचा उपद्रव होण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. १० फेब्रुवारीला येत असलेल्या मौनी अमावस्येला सुमारे ३ कोटी तर १५ फेब्रुवारीच्या वसंत पंचमीला सुमारे २ कोटी भाविक कुंभमेळ्यात हजेरी लावणार आहेत.
देव दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून निघालेला अमृतकुंभ राक्षसांच्या हाती लागू नये म्हणून देवांनी तो पळविला तेव्हा त्या कुंभातून चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले तेथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरविला जातो. हरिद्वार, अलाहाबाद, उज्जेन आणि नाशिक येथे हा कुंभमेळा भरविला जातो. कुंभमेळ्याचा पहिला लिखित पुरावा मिळतो तो चीनी प्रवासी हुआंग त्संग यांच्या लेखनातून. त्याने भारताला हर्षवर्धन राजाच्या काळात भेट दिली होती तेव्हा ६२९-६३० साली केलेले कुंभमेळ्याचे वर्णन वाचायला मिळते. मात्र भागवत पुराणातही कुंभमेळ्याचे उल्लेख येतात.