शालेय शिस्तीची नवी समीकरणे

मुलांचे शाळेतील वागणे किवा तासाला हजर गैरहजर राहणे या संदर्भात जर काही अनियमीतता असेल तर पालकांना शिक्षा देण्याचा कायदा ब्रिटनमध्ये असल्याची माहिती या आठवड्यात त्या कायद्याच्या दहा वर्षातील आढाव्याच्या निमित्ताने पुढे आली आहे. गेल्या बारा वर्षात जवळ जवळ ऐशी हजार पालकांना तुरुंगवास व दंड अशा स्वरुपाच्या शिक्षा झाल्या आहेत.अलिकडे माहिती तंत्रज्ञानाच्या सोयीमुळे एखादी गोष्ट जगाच्या एखाद्या कोपर्या्त घडली की ती दुसर्या  कोपर्याात पोहोचायला काही मिनिटे पुरतात त्यामुळे अशा बाबींची माहिती वेगाने उपलब्ध होते. वृत्तपत्रेही अशा घटना चौकटीत देऊन रिकामी होतात. जगातील अनेक दैनिकांनी ही बातमी चौकटीत दिली आहे. जगातील अनेक महत्वाच्या बातम्यांच्या रेट्यात ही बातमी भारतातील वृत्तपत्रापर्यंत पोहोचेलच असे नाही पण भारताच्या दृष्टीने ही बातमी महत्वाची आहे कारण गेल्या दहा वर्षात मुलांना शिक्षा करण्यावर येथे जवळ जवळ बंदी आहे.

ब्रिटनमध्ये मुलांनी जर शाळेत गैरवर्तणूक केली तर आईवडिलांना तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते पण आपल्याकडे मुलाने गृहपाठ करून नीट आणला नाही व त्यासाठी शिक्षकाने त्याला हातावर छडी मारली तर त्या शिक्षकाला निलंबनाची शिक्षा होऊ शकते. भारतात शिक्षेची जुनी पद्धती काय होती व ती योग्य कि अयोग्य यावर सविस्तर चर्चा करता येईल पण ज्या देशाने निम्म्या जगावर दीडशे वर्षे साम्राज्य केले त्या देशाची त्यांची पुढची पिढी घडविण्याची पद्धती काय समोर ठेवली होती हे बघणे अधिक उपयोगी होईल.अलिकडे कार्पोरल पनिशमेंट म्हणजे शालेय शिक्षा यांना जागतिक मानवहक्क आयोगाच्या निर्देशानुसार बंदी असल्याने ब्रिटनने अशा शिक्षांचा मार्ग निवडला आहे.

या आठवड्यात ब्रिटनच्या शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार तेथे दरवषीं दहा हजार पालकांना मुलांना नीट शिस्त न लावल्याबद्दल शिक्षा केल्याची आकडेवारी पुढे येत आहे. ब्रिटनच्या कायद्यानुसार विद्यार्थ्यांनी जर शाळेत जर गैरवर्तन केले तर त्यावर कारवाई होतेच पण जर त्याला त्याचे पालक जबाबदार असतील किवा त्यांचे दुर्लक्ष जर जबाबदार असेल तर त्यांच्यावर तुरुंगवासाच्या शिक्षेपर्यंतची शिक्षा होते. अशी शिक्षा होण्याचा आकडा सध्या वर्षाला दहा हजार आहे आणि ही सारी वाढ गेल्या दहा वर्षातील आहे. ही शिक्षा म्हणजे अन्य गुन्हेगारीतील शिक्षेप्रमाणे लंाब पल्याचा तुरुंगवास नाही पण पाच महिन्यांपर्यंतचा कारावास भोगावा लागतो.

अर्थात ही शिक्षा फक्त कारावासाचीच आहे असे नाही. पण सन.२००१ ते २०११ या दहा वर्षात ६१ हजार ३६७  जणांना मुलांच्याकडे दुर्लक्ष केल्याची पालकांना शिक्षा झाली आहे. त्यातील १५३ जणांना कारावास झाला आहे. पण यातील लक्षवेधी बाब म्हणजे बारा वर्षापूर्वी दर वर्षाला या कलमाखाली शिक्षा होण्याची संख्या फक्त दोन हजार होती ती आता दहा हजार झाली हे अधोगतीचे लक्षण आहे की, लोकजागृतीमुळे यावर न्यायालयात जाण्याचे प्रमाण वाढले आहे हे तेथील लोकच सांगू शकतील पण तेथील जाणकारांच्या मते लोकांची मुलांच्याकडे बघण्याची वृत्ती बदलली आहे त्यामुळे या शिक्षा होत आहेत. लिशा अॅश्फोर्ड या चाळीस वर्षाच्या महिलेच्या मुलीने शंभर दिवस शाळा बुडविली म्हणून तिच्या आईला बारा आठवडे तुरुंगवास भोगावा लागला. मुलांच्या गैरहजेरीबाबत पालकांना शिक्षा करण्याचे अधिकार ब्रिटनमध्ये सन २००० मध्ये प्राप्त झाले त्यामुळे याकडे लक्ष वाढू लागले. गेल्या वर्षात ५६ हजार ५०० मुलांनी शाळात विना परवानगी गैरहजेरी लावली. हे प्रमाण तेथील मुलांच्या संख्येच्या एक टक्का आहे.

अमेरिकेतही अशा शिक्षांचे कायदे अस्तित्वात आहेत पण तेथे एक अधिक सोय आहे ती म्हणजे जे पालक गरीब आहेत त्यांना त्यांच्या दंडाची रक्कम कमी असते. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांचे या संदर्भातील तेथील संसदेतील विधान धक्कादायक आहे. ते म्हणतात, ‘ मुलांच्या बेशिस्तीबाबत शिक्षेची भाषा काढली की लगेचे मानवी हक्कवाले आक्रमक होतात आणि आम्हाला क्षणभरही काम करू देत नाहीत पण चीनने त्यांच्या मुलांच्या तयारीसाठी किती कडवा कार्यक्रम ठेवला आहे याची कोणी माहिती तरी करून घेतली आहे काय ? त्यांना आता महासत्ता व्हायचे आहे आणि त्याची सुरुवात त्यांनी मुलांना फारच कडक शिस्त लावण्याने सुरु केली आहे.

एकेकाळी आपण महासत्ता होतो व अजूनही आपल्यावर बर्याडच जबाबदार्यार आहेत आपल्या पणजोबांच्या पिढीने आजोबांच्या पिढीला शिस्त लावली म्हणून आपले वाडवडील जगाला काही शिस्त लावू शकले आता ही जबाबदारी आपल्यावरआली आहे त्याची सुरुवात आपण करीत आहोत या विषयाकडे राजकारणातीत होऊन बघावे अशी माझी विरोधी पक्षांनाही विनंती आहे.त्यांनी आपल्या भाषणात चीन आणि भारतातील तरुण अधिक तयारीने जागतिक वातावरणात उतरत आहेत त्यांच्या तुलनेत जर ब्रिटिश तरुणांनी टिकायचे असेल तर शालेय वातावरण कडक शिस्तीचेच लागेल.असे त्यंानी त्या दोन देशाचे उल्लेख करून स्पष्ट केले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरोन यांनी जरी शाळेतील शिस्तीची आणि विद्यार्थ्यांना करावयाच्या मर्यादित शिक्षेची भलावण केली तरीही ते त्यांच्या देशात मुलांना शिक्षा करू शकतील असे मात्र अजिबात नाही. कारण जगभर मुलांच्या शिक्षा बंद होण्याला सध्या गती आली आहे. याचे कारण त्या त्या देशातील शिक्षणतंज्ञांनी मागणी केली आहे असे अजिबात नव्हे तर जागतिक मानवहक्क संरक्षण कायद्याचे तसे सूत्रच आहे. तरीही शाळामधून छडी मारणे, थोबाडित मारणे आणि कान पिळणे या शिक्षा सुरु कराव्यात अशा शिफारसी होऊ लागल्या आहेत. अर्थात एखाद्या मुलाला नाजूक हाताने त्याच्या आईने छडी मारणे आणि नाना पाटेकर याने त्याच्या खास शैलीने छडी मारणे यात फरक आहे. नानाने बॉलपेने जोराचा छेद करून उभी छाती फाडून खून केल्याचे दृश्य भारतीय चित्रपटात आहेत. त्यामुळे लाउड स्पीकरच्या आवाजाचे जसे डेसिमल ठरवतात त्याच प्रमाणे छडीच्या माराचेही डेसिमलप्रमाणे नवे प्रमाण निश्चत करावे लागेल.

अजूनही जगात निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रात शालेय शिक्षा सुरु आहेत. त्याला जगभर कार्पोरल पनिशमेंट असा शब्द आहे.  हातावर छडी मारणे, थोबाडीत मारणे, कान पिळणे आणि उठाबशा काढायला लावणे अशा शिक्षा त्या त्या देशात शिल्लक आहेत. जेथे अशा सौम्य शिक्षा आहेत त्या ठिकाणची मुले अधिक संस्कारीत आहेत, असे सर्वसाधारण निरीक्षण आहे. लहानपणी आपल्याला एक गोष्ट सांगितली जायची. ती म्हणजे एका खुन्याला फाशीची शिक्षा झाली व त्याने शेवटची इच्छा म्हणून आईची भेट मागितली. प्रत्यक्ष भेटीत त्याने आईचा कान चावला. त्यावर तो म्हणाला, मी पहिल्यांदा जेंव्हा शेजारच्या मुलाची पेन्सील चोरली तेंव्हा तू माझे कौतूक न करता जर कान पिळला असतास तर मी आज खुनी झालो नसतो. आज शाळेत अशा शिक्षांना बंदी आहे अजून काही दिवसांनी प्रत्येक घरी अशा शिक्षांना बंदी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भात नव्याने जागरण होण्याची गरज आहे.

Leave a Comment