ओबामा शपथविधीसाठी वापरणार दोन बायबल

वॉशिग्टन दि.१२- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसर्यांादा आरूढ होणारे बराक ओबामा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताना दोन बायबलचा वापर करणार असून अमेरिकेच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडत आहे. माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन आणि अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करण्यासाठी प्राणाची आहुती दिलेले नेते मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर या दोघांच्या बायबलवर हात ठेवून ओबामा शपथ ग्रहण करणार आहेत. अर्थात राजकीय शपथविधीसाठी ओबामा या दोन बायबलचा उपयोग करणार असले तरी व्हाईट हाऊस मधील शपथविधीसाठी मात्र ते फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या माहेरचे बायबल वापरणार आहेत.

मार्टिन ल्यूथर किंग यांनी अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करण्यासाठी अपूर्व लढा दिला आणि ओबामा हे पहिले ब्लॅक प्रेसिडेंट आहेत. हा शपथविधी २१ जानेवारीला होत असून हा दिवस फेडरल हॉलिडे म्हणून साजरा केला जातो. पन्नास वर्षांपूर्वी याच दिवशी किंग यांनी गुलामगिरी विरोधात ऐतिहासिक भाषण केले होते. ओबामा यांनी गेल्या वेळीही म्हणजे २००९ साली शपथ ग्रहण करताना अब्राहम लिंकन यांनी १८६१ साली शपथ घेताना वापरलेल्या बायबलचाच वापर केला होता.  लिंकन यांनी वापरलेले बायबल वापरून आपल्या राष्ट्राध्यक्षपद कारकिर्दीची सुरवात करणारे ओबामा हे पहिलेच अध्यक्ष आहेत.