सईदने ओकली पुन्हा गरळ; धुळे दंगलीतही सहभागाचा संशय

नवी दिल्ली: सीमेवर निर्माण झालेल्या तणावाला भारतीय सैन्य जबाबदार असून भारतातील गैरप्रकार आणि जातीय दंगली यावरून भारतीय नाहारिक आणि जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी सीमेवर तणाव मुद्दाम निर्माण केला जात आहे; असा आरोप कुख्यात दहशतवादी; लष्कर ए तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा ‘मास्टरमाईंड’ हाफीज सईद याने केला आहे. आपल्या स्वार्थासाठी पाकिस्तानला अस्थिर करण्याचे प्रयत्न भारताने थांबविले नाहीत तर काश्मीरमध्ये पुन्हा रक्ताचे पाट वाहतील; अशी विषारी गरळही त्याने ओकली आहे.

पाक लष्कराकडून नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय सैनिकांची हत्या केली जाण्यापूर्वी सईद याचा सीमावर्ती प्रदेशात वावर होता; हा भारताचा आरोपही सईदने फेटाळला. याबाबतचे सत्य जगासमोर यावे यासाठी आपण आपल्यावरील आरोप सिद्ध करण्याचे खुले आव्हान भारतीय गुप्तचर यंत्रणांना देत आहोत; असेही सईद याने ‘ट्विटर’वर म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची दिशाभूल करून पाकिस्तानला अस्थिर करण्याची भारताची नेहमीचीच चाल असल्याचा आरोपही त्याने केला.

दरम्यान; धुळे येथे अत्यंत किरकोळ कारणावरून उसळलेल्या जातीय दंगलीच्या मागे सईद कारणीभूत असल्याची धक्कादायक माहिती पउधे येत असून धुळे जिल्हा प्रशासनाने या शक्यतेला दुजोरा दिला आहे. पोलीस तपासाची चक्रेही आता ही दंगल पूर्वनियोजित आणि व्यापक कटच भाग असल्याच्या दिशेने फिरू लागली आहेत.

पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून दोघा भारतीय सैनिकांची हत्या केली आणि त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली. या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमागे धर्मगुरूचा मुखवटा पांघरून पाकिस्तानात राजरोस वावरणारा सईद हाच सूत्रधार असल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे धुळ्यासारख्या फारशा दंगलप्रवण नसलेल्या शहरातही क्षुल्लक कारणाने झालेल्या वैयक्तिक भांडणाचे पर्यवसान जातीय दंगलीत होण्यासही सईदची चिथावणी कारणीभूत असल्याचे धागेदोरे मिळाले आहेत. प्रत्यक्ष दंगलीत दहशतवादी शक्तींचा किती आणि काय सहभाग होता; याबाबत पोलीस शोध घेत आहेत.

धुळे येथील मच्छी बाजारात रविवारी रेस्टॉरंटमध्ये झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दंगलीत झाले आणि शहराच्या अन्य भागात ही दंगल वेगाने पसरली. धुळ्यात पोलिसांनी संचारबंदी लागू केली. दंगल आटोक्यात आणण्यासाठी प्रथम पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर केला. मात्र दंगल आटोक्यात येत नाही असे दिसताच गोळीबार करण्यात आला. या दंगलीत ५ जण मृत्युमुखी पडले तर ११० जण जखमी झाले आहेत.

हॉटेलमधील बिल देण्यावरून हॉटेलचालक आणि ग्राहक यांच्यात झालेल्या किरकोळ वादावरून धुळ्यात ही दंगल भडकण्यापूर्वी शहरात मोबाईल फोनवरून सईद याच्या चिथावणीखोर आणि धार्मिक भावना भडकविणाऱ्या भक्षणाचे ध्वनिमुद्रण आणि दृकश्राव्य फितीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यात आला. त्याचप्रमाणे याबाबत चर्चाही घडविण्यात आल्या; असे तपास यंत्रणांच्या निदर्शनास आले असून जिल्हा प्रशासनाने त्याची पुष्टी केली आहे. यावरून ही दंगल मुद्दाम भडकविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

सईद याच्या भाषणाबरोबरंच आंध्रप्रदेशातील जेरबंद आमदार अकबरुद्दिन ओवेसी याच्या भडकाऊ वक्तव्याचा या दंगलीशी संबध आहे काय; याची चाचपणीही तपास यंत्रणा करीत आहेत.