हाताचे यशस्वी प्रत्यारोपण

ब्रिटनमध्ये मानवाच्या हाताचे प्रत्यारोपण करण्याची पहिलीच घटना घडली आहे. मार्क केहिल ५१ वर्षांचे असून त्यांच्या उजव्या हातामध्ये गाठ झाल्यामुळे त्यांचा हात काम करत नव्हता. त्यासाठी आठ तास चाललेल्या शस्त्रक्रियेमध्ये त्यांच्या हाताचे डॉक्टरांनी प्रत्यारोपण केले आहे. मार्क यांची तब्येत हळूहळू ठीक होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे . ही शस्त्रक्रिया कितपत यशस्वी झाली आहे हे अजून निश्चित सांगता येणार नाही. मार्क यांची बोटे ही हालचाल करु शकतात परंतु त्यांना अजून संवेदना होत नाही. मार्क जेव्हा त्यांच्या प्रत्यारोपण केलेल्या हाताकडे बघतात आणि हालचाल करतात तेव्हा त्यांना त्यांचा हात असल्यासारखेच वाटते. मार्कचा हात अजूनही पट्ट्यांनी बांधलेला असून ते फक्त बोटे हलवू शकतात.
 
मार्कचा हात हळूहळू कार्यरत होत जाईल आणि यामध्ये स्पर्शही जाणवेल अशी आशा डॉक्टरांना आहे. एक कृत्रिम हात बसवण्याचा उपायही डॉक्टरांकडे होता. परंतु अवयव दानामध्ये मिळालेल्या या हातामुळे डॉक्टर आणि मार्क या दोघांना आशेचा किरण दिसला आहे. मार्कची शस्त्रक्रिया डॉक्टरांसाठी सोपी नव्हती. जेथे हात दुमडता येतो तिथून डॉक्टरांनी मार्कचा हात कापला होता.

२७ डिसेंबरला अवयव दानामधील हात मिळाल्यानंतर ही शस्त्रक्रिया होऊ शकली. ही शत्रक्रिया मोठी आव्हानात्मक होती असे प्लास्टिक सर्जन, प्रोफेसर सायमन यांनी सांगितले. अशा प्रकारची ब्रिटनमधील पहिली शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेला अजून जास्त दिवस झाले नसले तरी रुग्णाच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याची लक्षणे दिसत आहेत. अवयव दान करणा-या व्यक्तीचे मार्कने आभार मानले आहे. जगामध्ये या प्रकारची पहिली शस्त्रक्रिया ही न्यूझीलँडच्या क्लिंट हेलमची झाली होती ज्यांनी त्यांचा हात हा एका अपघातामध्ये गमावला होता.

अशा प्रकारच्या ६० शस्त्रक्रिया जगात आतापर्यंत झालेल्या आहेत.