यशवंतराव चव्हाण साहित्य नागरी (चिपळूण): प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करू पाहणारे साहित्य हे अधिक लक्षणीय असते. वास्तवाशी झगडून भान देणारे, जागे करणारे, नव्या मूल्यांची व विवेकाची लावणी करणारे असते. या ठिकाणी लेखक व्यवस्थेवर आघात करण्याबरोबरच उपेक्षितांचा आवाज मुखर करण्याचा पयत्न करातो हे साहित्य उपेक्षित होऊ शकते तरीही हेच साहित्य चिरकाळ टिकते असे प्रतिपादन ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.
संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. कोतापल्ले बोलत होते. १९७० नंतरच्या काळात संघर्ष करणाऱ्या साहित्याला खऱ्या अर्थाने बहर आला. त्यानंतरच्या काळात साहित्यामध्ये विविध प्रवाह आले त्यात दलित साहित्य हा प्रमुख आणि महत्वाचा प्रवाह राहिला आहे. व्यवस्थेशी संघर्ष करण्याचा पवित्रा ग्रामीण साहित्यानेही घेतला आहे. इथेही जातीच्या भिंती पाडण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे दिसते. स्त्री वादी साहित्यानेही पुरुषसत्ताक साहित्याविरूद्ध संघर्षाचाच पवित्रा घेतला आहे. जातिव्यवस्थेची पाळेमुळे समजल्याशिवाय हा संघर्ष अपूर्ण असल्याचे स्त्रीवादी साहित्यिकांनी लक्षात घ्यावे; असे आवाहनही डॉ. कोतापल्ले यांनी केले.
कोणत्याही लेखकाने भूमिका घेणे आवश्यक असते; असे आग्रही प्रतिपादन करून डॉ. कोतापल्ले म्हणले की; पुष्कळदा साहित्य हे करमणुकीचे भाबडेपणाचे, निरुपद्रवी क्षेत्र आहे असा समज करून घेतला जातो. मात्र साहित्य ही रणभूमी असते हे भूमिका न घेणाऱ्या साहित्यिकांनी लक्षात घ्यावे. जे लेखक याचे भान ठेवतील त्यांच्या गाथा इंद्रायणीत कितीही बुडवल्या तरी त्या तरून वर येतील; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
केवळ मराठी माध्यमांच्या शांळांना परवानगी देउन भाषा टिकणार नाही त्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न करण्याचे गरज आहे जागतिक दर्जाचे; तसेच इतर भारतीय भाषांमधील आधुनिक साहित्य मराठीत आणून भाषेचा परीघ रूंदावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज डॉ. कोतापल्ले यांनी व्यक्त केली.
मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाके म्हणाले, संमेलनाध्यक्षाला संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठा दिली जाते. संमेलन हा भाषेचा महोत्सव आहे. तरीही काही विचारांचे लोक काही ना काही कारणाने यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात यातून मनात विषण्णता उत्पन्न होते. विरोध करण्याचा प्रत्येकालाच अधिकार असला तरी त्यात किमान तारतम्य बाळगण्याची आवश्यकता असते; याची जाणीव त्यांनी करून दिली. साहित्य समेलनामधुन राजकारण्यांना वर्ज्य न करता त्यांचे साहित्य मूळ प्रवाहात सामावून घेतले तर मराठी भाषा अधिक समृद्ध होईल आणि विस्तारेल; असे मत व्यक्त करून डहाके म्हणाले की; राजकाराण्यांनी ही साहित्यिकांना विरोध न करता त्यांच्या आणि विस्थापितांच्या, दुर्बलांच्या बाजूने उभे राहण्याची आवश्यकता आहे.
यावेळी समंमेलनाच्या ‘रत्नप्रभा’ या स्मरणिकेचे प्रकाशना शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य आणि प्रमुख कार्यवाह प्रा. मिलंद जोशी यांनी डॉ . कोतापल्ले यांना एक लाख रूपयांचा धनादेश प्रदान केला.