देशाचे स्वत्व जागृत करणारा नेता

स्वामी विवेकानंद  अमेरिकेत सर्वधर्म परिषदेत  सहभागी होण्यासाठी गेले तेव्हा त्यांचे वय केवळ २८ वर्षे होते. त्याच काळात भारतात काही जाणकार लोकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आकांक्षा जाग्या होत होत्या. असे काही हाताच्या बोटावर मोजता येणारे लोक सोडले तर सारा देश पारतंत्र्याच्या, गुलामीच्या आणि पर्यायाने न्यूनगंडाच्या गाढ झोपेत होता. या देशाला परकीय सत्तेच्या जोखडातून सोडवायचे असेल तर या गाढ निद्रेतल्या भारतीय जनतेला जागे करणे गरजेचे होते. त्यांना न्यूनगंडातून बाहेर काढणे आवश्यक होते आणि त्यांचा स्वाभिमान जागा करण्याची आवश्यकता होती.

विवेकानंदांनी अमेरिकेत आपल्या अल्पशा भाषणाने अमेरिकला हालवून सोडले. ते सर्वधर्म परिषदेच्या व्यासपीठावर ताठ मानेने उभे राहून गर्जले, अमेरिकेचा शोध कोलंबसाने लावला असला तरीही या देशाला आपल्या आत्म्याचा शोध घेण्याचे तंत्र आणि मंत्र आम्ही शिकवणार आहोत. एका गुलाम देशातला काळ्या सावळ्या वर्णाचा संन्याशी ताठ मानेने अमेरिकेत उभा राहून ही गर्जना करतो याचा अर्थ या देशात काही तरी असणार आहे अशी खात्री जगाला पटली.

ही खात्री जगाला पटण्याआधी भारतीयांना पटली आणि भारतीयांच्या तेजस्वी जीवनावरची न्यूनगंडाची राख फुंकली गेली. या देशाचा अभिमान जागा झाला. आपण कशात तरी श्रेष्ठ आहोत हे या लोकांना प्रथमच समजले.  देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा संग्राम पेटवायचा असेल तर याच स्वाभिमानाची आणि स्वत्वाची गरज होती. ती स्वामीजींनी अवघ्या एका भाषणाने पूर्ण केली. स्वातंत्र्य  संग्रामासाठी आवश्यक असलेली मनोवृत्ती त्यांनी निर्माण केली.  स्वामी विवेकानंद हे हजारो देशभक्तांना प्रेरणा देणारा आदर्श ठरले होते.

स्वातंत्र्यासाठी संघर्षरत असलेल्या तरुणांच्या त्या काळात बैठका होत असत तेव्हा त्या बैठकांचा प्रारंभ विवेकानंदांच्या प्रतिमांना हार घालून केला जात असे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही  स्वामीजींच्याच विचारांची प्रेरणा मिळालेली होती. अण्णा हजारे यांच्या समर्पित जीवनाचा आदर्शही स्वामी विवेकानंद हेच आहेत. आजही स्वामीजींचे विचार अनेकांना प्रेरणा देत असतात. स्वामीजींचे व्यक्तीमत्व तेजस्वी होते. प्रचंड वाचन, सतत चिंतन, सात्विक वृत्ती आणि आत्मविश्वास यामुळे स्वामीजींचे दर्शनच प्रचंड प्रेरणादायी ठरत असे.

स्वामी विवेकानंदांच्या जीवनातल्या या प्रसंगा विषयी लोकांना फार तपशीलात माहिती नाही. स्वामीजी या परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेत गेले, त्यांनी तिथे भाषण केले आणि त्यांनी सर्वांना जिंकून घेतले. इतके ते सहज घडून गेलेले नाही. त्या व्यासपीठावर पोहचेपर्यंत स्वामीजींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना अमेरिकेत काही वेळा तर उपासमार सुद्धा सहन करावी लागली. तिथे कोणाकडे जाऊन उतरावे याची कसलीच निश्चिती नव्हती. अमेरिकेत जाऊन कोणाकडे मुक्काम करायचा आहे, याची योजना न करताच स्वामीजी अमेरिकेला गेले होते. त्यांचे ते दिग्गज भाषण झाले त्याच्या आदल्या रात्री ते शिकागो रेल्वे स्थानकावरच्या पार्सलच्या खोक्यात झोपले होते.

मात्र सकाळी त्यांना रेल्वे स्थानकाच्या परिसरातल्या एका कुटुंबाने आधार दिला आणि परिषदेच्या ठिकाणी पोचवले, म्हणून ते तिथपर्यंत येऊ तरी शकले आणि याच कुटुंबाच्या ओळखीमुळे त्यांचे नाव वक्त्यांच्या यादीत समाविष्ट झाले. पण त्यांच्या मनाची तयारी झालेली नव्हती. त्यामुळे त्यांनी सभेच्या आयोजकांना आपले नाव नंतर पुकारण्याची विनंती केली. ते काहीसे गोंधळलेले होते. पण शेवटी भाषण तर केले पाहिजे. ते उभे राहिले आणि मग पुढचा सारा इतिहास घडला. त्यांचा तिथे एवढा प्रभाव पडला होता की नंतरची दोन वर्षे ते अमेरिकेत राहिले. तिथे त्यांची भाषणे झाली.       

स्वामीजी या आपल्या पहिल्याच भाषणामध्ये उपस्थित श्रोत्यांच्या मनात हिंदू धर्माविषयी उत्सुकता निर्माण करू शकले. हे सारे हिंदू धर्माच्या उदात्त तत्वांमुळे घडले. म्हणूनच हिंदू धर्माची मांडणी करण्यासाठी स्वामीजींचे या परिषदेत नंतर जे तासाभराचे भाषण झाले ते ऐकायला अमेरिकेच्या कानाकोपर्यासतले विचारवंत आवर्जून उपस्थित राहिले होते. स्वामीजींचा जगातल्या सर्व धर्मचा सखोल अभ्यास होता. त्यांचे इंग्रजी वक्तृत्व चांगले होते. त्यामुळे ते हे सारे करू शकले. त्यांनी पश्चिमेला पौर्वात्य संस्कृतीची खरी ओळख करून दिली.

१२ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. आजपासून त्यांच्या  १५० व्या जयंतीचे वर्ष सुरू होत आहे. या वर्षाभरात अनेक कार्यक्रम साजरे होत आहेत. या काळात आपण स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा समग्रतेने अभ्यास केला पाहिजे कारण ते स्वामीजी म्हणवले जात असले आणि भगवे कपडे घालत असले तरीही ते रूढार्थाने धर्माचार्य वगैरे नव्हते. ते अत्यंत पुरोगामी सामजिक विचारवंत होते. त्यांनी असंख्य भाषणातून धर्मातल्या अनेक वाईट रूढींवर कोरडे ओढलेले आहेत.

Leave a Comment