पाकिस्तानात साखळी बॉम्बहल्ल्यात ११६ ठार

क्वेट्टा: पाकिस्तान अफगाणिस्तान सीमाभागात शिया, सुन्नी संघर्षातून घडविण्यात आलेल्या ४ बॉम्बस्फोटात ११६ जण ठार आणि २३५ जण जखमी झाले. यापैकी ४ स्फोट क्वेट्टा शहरात; तर १ स्फोट स्वात खोऱ्यात झाला. हे स्फोट सुन्नी कट्टरपंथीय लष्कर ए झांगवी या दहशतवादी गटाने घडवून आणले.

क्वेट्टा शहरातील बचाखान भागात पहिला स्फोट गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता सुरक्षा चौकीवर स्फ़ोटकाने भरलेली कार धडकावून करण्यात आला. स्फोटाच्या ठिकाणी २ फूट खोल आणि ८ फूट रुंद खड्डा पडला. या स्फोटात १३ जण ठार; तर ५० जखमी झाले या स्फोटाने आजूबाजूच्या परिसरातील इमारती, दुकाने आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले. या गाडीत २५ किलो स्फोटके असावीत असा पोलिसांचा कयास आहे.

दुसरा स्फोट बरोबर २ तासांनी स्वत खोऱ्यातील मिंगोला शहरात झाला. या स्फोटात नमाज अदा करण्यासाठी जमलेले २२ जण ठार झाले आणि ६५ जखमी झाले. त्यानंतर रात्री पावणे नऊच्या सुमारास आलमदार रस्त्यावरील एका स्नूकर क्लबमध्ये आत्मघाती बॉम्बहल्ला झाला. त्यानंतर काही मिनिटातच याच ठिकाणाजवळ एका वाहनात स्फोट झाला. या दोन्ही स्फोटात ८१ जण ठार आणि १२१ जण जखमी झाले. मृतांमध्ये ९ पोलिसांचा समावेश आहे.

या स्फोटांबद्दल बलुचिस्तानात ३ दिवसाचा शोल पाळण्यात येत आहे.