हैदराबाद: मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना आंध्रप्रदेशातील निर्मल टाऊन न्यायालयाने ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ओवेसी यांच्यावर प्रक्षोभक भाषण करून देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी ७ दिवसाच्या कोठडीची मागणी केली होती.
ओवेसी यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी देण्यात येऊ नये; अशी विनंती करणारा अर्जही राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे मुथ्याम प्रभुदास यांनी केला आहे.
ओवेसी यांनी केवळ काही मिनिटांसाठी पोलीस यंत्रणा दूर केली तर देशातील बहुसंख्यांना अल्पसंख्यांक त्यांची जागा दाखवितील; असे विधान केले होते. अकबरुद्दीन आणि त्यांचे बंधू खासदार असदुद्दिन हे भडकाऊ भाषणांसाठी ओळखले जातात. त्यांच्या पक्षाने आंध्रच्या काही भागात उल्लेखनीय प्राबल्य मिळविले असून महाराष्ट्रातील नांदेड नगरपालिकेतही त्यांचे १३ नगरसेवक निवडून आले आहेत.