अल्पवयीन युवतीला जिवंत जाळले: बलात्काराचाही संशय

सरायकेला: झारखंड येथील एका खेडेगावात तीन गुंडांनी जबरदस्तीने घरात घुसून एका १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन युवतीला जिवंत जाळले. तिला पेटविण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले गेल्याची शंका आहे. आरोपींपैकी एकाला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले तर इतर दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सोमवारी रात्री उशीरा तिघे जण शस्त्रांसह या युवतीच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसले. त्यांनी शस्त्राच्या धाकाने या युवतीच्या आई, वडील आणि लहान भाऊ, बहिणीला घराबाहेर काढले आणि या युवतीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटविले. या युवतीच्या बहिणीने घराबाहेर जाऊन आरडओरडा केल्याने गावकरी जमा झाले. त्यांनी एका हल्लेखोराला पकडले. पेटत्या अंगानेच ही युवती घराबाहेर पडून सैरावैरा पळू लागली. तिच्या पालकांनी गावकऱ्यांच्या मदतीने तिला पकडून आग विझवली. तिला उचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता काही वेळातच तिचा मृत्यू झाला.

हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडल्याचा पोलिसांचा कयास आहे; तर या तिघांनी पूर्वी या युवतीवर सामुहिक बलात्कार केल्याचा संशय गावकरी व्यक्त करतात.

Leave a Comment