टीबीवरील नव्या औषधाला अमेरिकेची मान्यता

न्यूयॉर्क: जगातील बहुतांश देशात; विशेषत: विकसनशील आणि मागसलेल्या देशात वैद्यकीय क्षेत्रासमोर आव्हान बनून राहिलेल्या ‘टीबी’ या जीवघेण्या आजारावर जॉन्सन एण्ड जॉन्सन या औषध निर्माण क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने ‘सर्ट्युरो’ हे नवीन औषध विकसित केले असून अमेरिकेच्या ‘एफडीए’ या अन्न व औषध नियंत्रक यंत्रणेने मान्यता दिली आहे. एफडीएने तब्बल चाळीस वर्षानंतर टीबीसाठीच्या औषधाला प्रथमंच मान्यता दिली आहे. इतर कोणत्याही उपचार पद्धतीचा उपयोग होत नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांसाठी हे औषध प्रभावी ठरेल; असा दावा कंपनीने केला असून विशेषत: तिसऱ्या जगातील रुग्णांना हे औषध वरदान ठरणार आहे.

टीबी या विकारात काही कालावधीनंतर उपचार आणि औषधांना दाद न देण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे ही औषधे निरुपयोगी ठरतात. या पार्श्वभूमीवर जॉन्सन एण्ड जॉन्सनचे हे संशोधन विशेष उपयुक्त ठरणार आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक टीबीच्या विषाणूंनी बाधित आहेत. अमेरिकेत या रोगाचे प्रमाण कमी असले तरीही जगभरात दरवर्षी १४ लाख रुग्ण टीबीच्या विकाराने मरण पावतात. त्यापैकी दीड लाख रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारांना दाद न देण्याची क्षमता टीबीच्या विषाणूमध्ये निर्माण झाल्याने ते असहाय्य अवस्थेत मरण पावतात. टीबीच्या जगभरातील रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण भारत, चीन, रशिया आणि पूर्व युरोपमध्ये आहेत.

टीबीच्या ज्या रुग्णांवर इतर कोणत्याही उपचार पद्धतीचा उपयोग होत नाही; अशा रुग्णांसाठी सर्ट्युरो प्रभावी ठरेल; असा विश्वास एफडीएच्या औषध निर्मिती आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ . एडवर्ड कॉक्स यांनी सांगितले. मात्र या औषधाचे धीकादायक ‘साईड इफ़ेक्ट्स’ लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांनी केवळ इतर पर्याय उपलब्ध नसलेल्या रुग्णांवर सारासार विचाराने या औषधाचा प्रयोग करावा; असे आवाहनही डॉ. कॉक्स यांनी केले आहे.

सर्ट्युरो हे औषध जॉन्सन एण्ड जॉन्सनच्या प्रयोगशाळेत दीर्घ संशोधनानंतर एक दशकापूर्वीच लागला. मात्र त्याच्या काटेकोर चाचण्या आणि परिपूर्ण संशोधनानंतरच कंपनीने हे औषध बाजारपेठेत आणले आहे; असा दावा जॉन्सन एण्ड जॉन्सन कंपनीच्या वतीने करण्यात आला. एफडीएच्या वतीने तब्बल ४० वर्षानंतर सर्ट्युरो औषधाला देण्यात आलेल्या मान्यतेमुळे कंपनीच्या संशोधन आणि विकास यंत्रणेबरोबरंच नाविन्यपूर्ण औषध निर्मितीच्या जबाबदार प्रक्रियेवर मान्यतेची मोहोर उमटली आहे; असे जॉन्सन एण्ड जॉन्सनच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment