धावत्या रेल्वेत बलात्काराचा प्रयत्न: जवान जेरबंद

बक्सर: महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात देशभरात आगडोंब उसळलेला असताना बिहारमध्ये चालत्या रेल्वेत लष्करी जवानाकडून महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महिलेने चालत्या रेल्वेतून उडी मारून आपले शील वाचविण्याचा प्रयत्न केल्याने ती गंभीररित्या जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू असून अत्याचारी जवानाला पोलिसांनी अटक केली.

बिहारमधून आरा, बक्सर मार्गे दिल्लीकडे निघालेल्या ब्रह्मपुत्र एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी दुपारी प्रसाधनगृहात गेलेल्या महिलेवर रमेश कुमार या जवानाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. प्रसाधनगृहाचे दार उघडताच या महिलेने डब्याच्या दरवाजातून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र याच डब्यातून प्रवास करणारे आणखी एक जवान ए. डी. उपाध्याय यांनी तिला पकडून पुन्हा डब्यात घेतले. मात्र त्यांच्या हाताला हिसडा देऊन ती महिला डब्याच्या दुसऱ्या बाजूच्या दरवाज्यात गेली आणि तिने धावत्या रेल्वेतून खाली उडी मारली. उपाध्याय यांनी या घटनेची माहिती रेल्वेतील महिला तिकीट तपासनीसाला दिली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरा रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी या महिलेला रुग्णालयात दाखल केले. ही महिला बेशुद्धावस्थेत आहे.

गाडी बक्सर स्थानकावर थांबल्यानंतर उपाध्याय यांनी घडलेल्या प्रकारची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. उपाध्याय यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून बक्सर रेल्वे पोलिसांनी रमेश कुमार याला अटक केली. रमेश हा मूळ हिमाचल प्रदेशातील असून अरुणाचल प्रदेशात २०- जम्मू काश्मीर रायफल्सच्या तुकडीत नेमणुकीला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडीत महिलेबद्दल अधिक माहिती मिळू शकत नसली तरी ती दार्जीलिंगची असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Leave a Comment