धोनीला कर्णधारपदावरून हटवा: श्रीकांत

कोलकाता: पाकिस्तानबरोबर झालेल्या एकदिवसीय मालिकेतील लाजीरवाण्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनी याच्याकडून कर्णधारपद काढून घ्यावे असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू के. श्रीकांत यांनी व्यक्त केले. याशिवाय सलामीच्या फलंदाजांची जोडी बदलण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

दोन वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीमध्ये आता पूर्वीची चमक राहीलेली नाही; असे श्रीकांत यांचे मत आहे. त्याचे कर्णधारपद काढून घेण्याबरोबरच संघात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची आवश्यकता श्रीकांत यांनी प्रतिपादन केली.

मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमावल्यानंतर धोनीकडून कर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय निवड समितीने घेतला होता. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तो निर्णय अमलात आणू दिला नाही; असे तत्कालीन निवड समिती अध्यक्ष मोहिंदर अमरनाथ यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. माजी कर्णधार कपिल देव, मनोज प्रभाकर आणि विनोद कांबळी यांनीही धोनीला हटवण्याची मागणी केली आहे. भारताचे सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर दीर्घ काळ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरत असल्याने सलामीला नवी जोडी पाठवावी; असे मतही प्रभाकर आणि विनोदने व्यक्त केले.

Leave a Comment