अपहृत पाक सुरक्षा रक्षकांची हत्या

इस्लामाबाद: तालिबान दहशतवाद्यांनी अपहरण करून नेलेल्या २१ पाकिस्तानी सुरक्षा जवानांची हत्या करण्यात आल्याची माहिती पेशावर पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. या अपहरणाची आणि हत्येची जबाबदारी तहरिक ए तालिबान या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

पेशावरजवळ असलेल्या चेकपोस्टवर हल्ला करून सुमारे दोनशे सशस्त्र तालिबान अतिरेक्यांनी पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या २१ जवानांचे अपहरण केले होते. या हल्ल्यात दोन जवानांचा मृत्यू झाला होता. या अपहृत जवानांचे मृतदेह पेशावर जवळ असलेल्या जबाई परिसरात पडल्याचे एका स्थानिक जवानाला आढळून आले. त्याने याबाबत पेशावर पोलिसांना माहिती दिली. या सर्व जवानांच्या शरिरात बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत.

जवळंच असलेल्या एका क्रिकेट मैदानात सर्व जवानांची हत्या करून नंतर मृतदेह मैदानाबाहेर टाकून दिले असावे; असा पेशावर पोलिसांचा कयास आहे.

Leave a Comment