लंडन दि.२१ – पुढील वर्षात म्हणजे २०१३ सालात जगभरातील सर्व देशांवर परिणाम करू शकणारी १० लाख गुप्त कागदपत्रे विकिलिकस वेबसाईटवर उघड करणार असल्याचे विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याने जाहीर केले आहे. लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात गेले सहा महिने आश्रयास असलेल्या असांजेने गुरूवारी याच दूतावासाच्या बाल्कनीतून ख्रिसमस मेसेज देताना केलेल्या भाषणात हे जाहीर केले. त्याच्या या सभेला १०० समर्थक उपस्थित होते.
असांजे म्हणाला की मी येथे आश्रय घेतला आहे. स्वीडनला हस्तांतरण होऊ नये यासाठी केलेल्या दाव्यात मला अपयश आल्याने मी इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला आहे आणि या देशाने मला राजाश्रयही दिला आहे. गेले सहा महिने एकाच खोलीत मी रहातो आहे. तरीही माझ्या वेबसाईटवर गुप्त कागदपत्रे प्रसिद्ध होणे सुरूच आहे. आत्ताही आमच्याकडे सर्व देशांवर परिणाम होईल अशी १० लाख अत्यंत गुप्त कागदपत्रे प्रसिद्धीसाठी तयार आहेत. ती पुढील वर्षात प्रसिद्ध होतील. मात्र कोणत्याही चर्चेसाठी आमची दारे उघडी आहेत आणि ती उघडीच राहतील.
ऑस्ट्रेलियाचा माजी कॉम्प्युटर हॅकर असांजे याने आपल्याला आश्रय दिल्याबद्दल इक्वेडोरचे अध्यक्ष राफेल कोरिया यांचे यावेळी आभार मानले आणि यूएस व अन्य पाश्चिमात्य देशांच्या सरकारांवर टीका केली. तो म्हणाला व्हाईट हाऊस म्हणजे लोकशाही नाही तसेच कॅमेरे म्हणजेही लोकशाही नाही. खोट्याच्या विरोधात खरे उघड करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष म्हणजे खरी लोकशाही आहे.