मोदींनी गड राखला पण…

भारतीय जनता पार्टीचे गुजरातमधील मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी विधानसभेची निवडणूक जिकून हॅटट्रिक केली आहे खरी परंतु त्याच वेळी भारतीय जनता पार्टीला हिमाचल प्रदेशातील विधानसभा गमवावी लागली आहे. हिमाचल प्रदेशाचे एक वैशिष्ट्य असे आहे की, तिथे १९७७ साल पासून कोणत्याही पक्षाला सलग दोनदा विजय मिळालेला नाही. हिमाचल प्रदेशाच्या जनतेने काँग्रेस आणि भाजपा या दोघांनाही आलटून पालटून सत्ता दिलेली आहे. त्यामुळे यावेळी भाजपाला घरी बसवून काँग्रेसला सत्ता मिळाली. खरे म्हणजे भारतीय जनता पार्टीला तिथे विजय मिळविता आला असता परंतु पक्षातल्या फाटाफुटीचे परिणाम त्यांना भोगावे लागले. पक्षाचे माजी खासदार महेश्वरसिंग यांनी पक्षाबाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन केला. ही फाटाफूट भाजपाला भोवली आणि काँग्रेसने त्यामानाने एकदिलाने निवडणूक लढविली.

भाजपाने गुजरातमध्ये मात्र कमाल केली आहे.  सलग पाचवा विजय मिळविला आहे. अशा प्रकारे अलीकडच्या काळात कोणत्याच राज्यात, कोणत्याही पक्षाला सलग विजय मिळविणे अशक्य होऊन बसलेले आहे. दिल्लीमध्ये शीला दीक्षित यांनी काही निवडणुका सलगपणे जिंकलेल्या आहेत. त्यांनी हॅटट्रिक केलेली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसनेही हॅटट्रिक केलेली आहे. डाव्या आघाडीने पश्चिम बंगालमध्ये आठवेळा निवडणुका जिंकल्या होत्या. परंतु त्यांची तिसरी हॅटट्रिक हुकली. मात्र या आघाडी शिवाय अन्य कोणालाही, कोणत्याही राज्यात एवढ्या सलग निवडणुका जिंकता आल्या नाहीत. भारतीय जनता पार्टीने मात्र अशा विक्रमी विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे.

भाजपाने गुजरातेत जिंकलेल्या पाच निवडणुकांपैकी तीन निवडणुका नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे नरेंद्र मोदी यांची ही हॅटट्रिक आहे. ती त्यांना का साध्य झाली याचे विश्लेषण आता होण्याची गरज आहे. डाव्या आघाडीने ज्यावेळी अशा काही सलग निवडणुका जिंकल्या होत्या त्यावेळी अनेक राज्यातले राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये जाऊन डाव्या आघाडीच्या या यशाचे नेमके रहस्य काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तिथे डाव्यांना मिळालेले यश हे आघाडीचे यश होते. त्यांच्या आघाडीमध्ये चार डावे पक्ष सहभागी होते. गुजरातमध्ये मात्र एकट्या भारतीय जनता पार्टीने हा विजय मिळविलेला आहे. आता हा विजय भाजपाचा की मोदीचा अशी चर्चा सुरू झालेली आहे. खरे म्हणजे ही चर्चा सयुक्तिक नाही.   

हा विजय एकट्या मोदींचा असता तर मोदींनी स्वतःचा पक्ष स्थापन करून तसा विजय मिळवून दाखवावा. ते त्यांना शक्य होणार नाही आणि मोदींना वगळून भाजपालाही गुजरातेत एवढा मोठा विजय मिळू शकणार नाही. एकंदरीत भारतीय जनता पार्टी आणि तिला मिळालेले मोदींचे नेतृत्व यांचा हा विजय आहे. ज्या लोकांना या विजयाबद्दल भाजपाला खिजवायचे आहे ते लोक हा विजय भाजपाचा नाही तर मोदींचाच आहे असे म्हणतात. त्यांना भारतीय जनता पार्टी हा लोकप्रिय पक्ष नाही असे म्हणायचे असते. उलट भारतीय जनता पार्टीचे समर्थक मोदींचीही स्तुती करतात आणि मोदीबरोबर भाजपालाही याचे श्रेय आहे हे आवर्जून सांगत असतात. तेव्हा हा विजय भाजपाला का मिळाला याचे नीट विश्लेषण होण्याची गरज आहे आणि ते विश्लेषण करताना नरेंद्र मोदी यांनी भाजपाला कशाप्रकारचे नेतृत्व प्रदान केलेले आहे याचे विश्लेषण करावे लागेल.

मोदींनी गुजरातमध्ये हिंदुत्वाचे वातावरण निर्माण केले आहे असे काही लोकांचे म्हणणे असते. २००२ साली झालेल्या जातीय दंगलीमध्ये मोदींची भूमिका दंगलखोर हिंदूंना अनुकूल अशी होती. ही गोष्ट कुणी अमान्य करू शकणार नाही. परंतु त्यांच्या त्या भूमिकेमुळे गुजरातमधील दंगेखोर मुस्लीम लोक वचकून राहायला लागले आणि त्यामुळे गेल्या दहा वर्षात गुजरातमध्ये एकदाही जातीय दंगलही झाली नाही आणि कधी संचारबंदीही लागू करावी लागली नाही. याचे श्रेय म्हणा की अपश्रेय म्हणा पण मोदीकडे जाते.

एवढी एक दंगल वगळता त्यांनी नंतरच्या दहा वर्षात हिंदू मुस्लीम वादावर कधीही टिप्पणी केली नाही, कधी हिदूंना भडकावले नाही आणि कधी मुस्लीमांना धमकावले नाही. म्हणजे त्यांनी नंतर हिंदुत्वाचा वापर केला नाही. २००२ च्या दंगलीत लोकप्रियता मिळवून सत्ता मिळविली आणि नंतर उत्तम प्रशासकीय गुणाच्या आधारे राज्याची प्रगती घडवली आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले आहे. गुजरातमध्ये जातीय दंगलींची फार मोठी परंपरा होती परंतु २००२ सालपासून एकही दंगल झालेली नाही याचा फायदा नक्कीच मोदींना मिळालेला आहे. एकही दंगल न होणे ही स्थिती जशी हिंदुसाठी सुखाची आहे तशी मुस्लिमांसाठीसुध्दा आहे. त्यामुळे आता अनेक मुस्लिम बहुल मतदार संघातून सुध्दा भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Leave a Comment