बाय बॅक वेपन्स योजनेला प्रचंड प्रतिसाद

शुक्रवारी कनेक्टीकट मधील न्यू टाऊन सँडड्यूक प्रायमरी शाळेत घडलेल्या गोळीबारच्या घटनेत २० बालकांसह २६  निरपराध लोकांचा बळी गेल्याची घटना अवघ्या अमेरिकेला हादरविणारी ठरली असून त्यामुळे आपण नक्की कोणत्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहोत याची तीव्र जाणीव नागरिकांना झाली आहे. त्यातूनच न्यूजर्सी परगण्यातील सर्वाधिक धोकादायक शहर अशी ओळख असलेल्या कॅमेडान येथील दोन चर्चमध्ये बाय बॅक वेपन्स योजना राबविण्यात आली. विशेष म्हणजे या योजनेला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळून शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत हजारांहून अधिक शस्त्रे नागरिकांनी येथे आणून दिली. कांही कायदेशीर तर कांही अवैध शस्त्रांचा त्यात समावेश असून त्यात पिस्तुले, रायफल्स, इलेफंट गन, १०० वर्षांपूर्वीचे अॅंटीक शस्त्र, रिव्हॉल्व्हर, शॉटगन, पाच फुल्ली ऑटोमेटिक वेपन्सचा समावेश आहे.

शस्त्रे आणून देणार्याु नागरिकांकडे शस्त्रासंबंधी कोणतीही चौकशी केली जाणार नाही तसेच संबंधितांची नांवेही उघड केली जाणार नाहीत असे जाहीर करण्यात आले होते. ७७००० लोकवस्ती असलेल्या या गावात १७० ड्रग मार्केट असून ७०० लोक पॅरोलवर सुटलेले आहेत तर ६०० जण दखलपात्र सेक्स ऑफेंडर आहेत. एफबीआयच्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक हिंसक गुन्हे नोंदले गेलेले हे शहर आहे. येथील खूनांच्या संख्येची आकडेवारी तर तर्कापलिकडे आहे. मात्र शुक्रवारच्या हत्याकांडानंतर येथील नागरिकांना शस्त्रे आता घराच्या आसपास सुद्धा नकोत असे वाटते आहे.

कॅमेडान येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमा झालेल्या शस्त्रांपैकी ९० टक्के शस्त्रे चालू स्थितीत आहेत. त्यातील कांही कायदेशीर आहेत तर कांही अवैध आहेत. चालू स्थितीतील रिव्हॉल्व्हर रायफल्स, पिस्तुलांना शस्त्राची किमत म्हणून २५० डॉलर्स दिले गेले आहेत तर कांही शस्त्रांना १५० डॉलर्स दिले गेले आहेत. निकामी शस्त्रांना ५० डॉलर्स दिले गेले. नागरिकांनी आणलेल्या या शस्त्रांचा चर्चमध्ये मोठा ढीग लागला होता. ही सर्व शस्त्रे नष्ट करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.