आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि बुंदेलखंडात विभागले गेलेले चित्रकूट हे पर्यटनस्थळ म्हणून आज लोकप्रिय ठरले आहे. मात्र पूर्वीपासूनच हे ठिकाण धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या भारतातील महत्त्वाचे स्थान आहे. अनेक मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे असलेल्या या ठिकाणाचा उल्लेख वाल्मिकी रामायणातही केला गेला आहे. चित्रकूट याचा अर्थच आहे अनेक आश्चर्ये असलेली टेकडी.
Chitrakoot-Mountains2
हिंदू जनमानसात अतिशय श्रद्धेचे स्थान असलेल्या राम सीता आणि लक्ष्मणाने त्यांच्या वनवास काळातील साडेअकरा वर्षांचा काळ चित्रकूट भागात व्यतीत केला असल्याचे मानले जाते. घनदाट अरणे, चित्रविचित्र आणि विपुल वृक्षसंपदा, तर्ह तर्हेडची फुले फळे यामुळे नटलेला हा भाग कुणालाही सहज भुरळ घालेल यात नवल नाही. सती अनुसुया, अत्री ऋषी, दत्तात्रेय, महर्षी मार्कंडेय अशा अनेक साधूसंतांनी येथे साधना करून अलौकीकत्व प्राप्त केले अशी श्रद्धा आहे. ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार येथेच झाला. वाल्मिकी रामायणात याचे संदर्भ सापडतात तसेच महाकवी कालिदासाच्या रघुवंशात येथील सुंदर नैसर्गिक सौंदर्यस्थळांचे वर्णन सापडते. यक्षाचे एकांतस्थळ म्हणून याचे वर्णन कालिदासाने केले आहे. मात्र चित्रकूट ऐवजी रामगिरी असे नांव या स्थळाला त्याने मेघदूतात दिले आहे. संत तुळशीदासाला रामदर्शनाचा लाभ याच ठिकाणी झाला होता.
Chitrakoot-Mountains1
भरत मिलाप – राम वनवासात गेल्यानंतर त्याला परत आणण्यासाठी गेलेले भरत आणि ज्या ठिकाणाहून त्याने रामाच्या पादुका नेऊन अयोध्येच्या सिहासनावर ठेवून कारभार केला ते ठिकाण हेच. मात्र भरत भेटीनंतर रामाने हे ठिकार सोडून दंडकारण्यात प्रवेश केला असे रामायण सांगते. भरत मिलाप येथे या चार दशरथ पुत्रांची झालेली भेट इतकी हृदयस्पर्शी होती की तेथील खडकही ती भेट पाहून वितळले. या खडकात उमटलेली राम सीतेची पावले आजही पाहायला मिळतात. जवळच असलेले जानकी कुंड म्हणजे सीतेच्या स्नानाची जागा. मंदाकिनी नदीच्या काठावर असलेला रामघाट आवर्जून पाहावा असाच. या ठिकाणी अनेक साधूसंतांनी साधना केली आहे. रात्रीची आरती फारच मनोहारी असते. येथेच रामाने तुळशीदासाला दर्शन दिले अशी भाविकांची श्रद्धा आहे.
Chitrakoot-Mountains
कामदागिरी पर्वत म्हणजे खरा चित्रकूट. घनदाट जंगलाने वेढलेली ही टेकडी तेथे अनेक मंदिरे आहेत. येथून १६ किमीवर असलेला सती अनुसुया आश्रम म्हणजे खरा वनविहार. येथे अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. अत्री मुनींच्या साधनेने पावन झालेले हे स्थान. याची कथा अशी सांगतात की या भागात दहा वर्षे पाऊसच पडला नाही. मग सती अनुसुयेने कडक तप आरंभिले. शेवटी तिच्या तपाचे फळ म्हणून स्वर्गातून मंदाकिनी नदी खाली आली आणि हा परिसर तृप्त झाला. रामानेही या ठिकाणी भेट दिली होती. येथेच त्याने सतीचे महत्त्व सीतेला कथन केले. येथून दंडकारण्याचा आरंभ होतो. दंडकारण्य हे रावणाचे अरण्य.

चित्रकूटपासून १८ किमीवर असलेले गुप्त गोदावरी हे स्थानही सुंदर असून येथे दोन गुहा आहेत. शेकडो फूट उंचीचा झरा हनुमान धारा म्हणून ओळखला जातो. हनुमान जेव्हा लंका जाळून आला तेव्हा त्याच्या शेपटीची होत असलेली आग विझविण्यासाठी रामाने हा झरा किवा धबधबा निर्माण केला असे मानले जाते. येथून चित्रकूटचे अतिशय नयनरम्य दर्शन होते.

या ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा टॅक्सी सेवा आहेच पण नागपूर किंवा रायपूर पर्यंत रेल्वेने येऊन पुढे अन्य वाहनांनी येथे जाता येते. पर्यटन स्थळ म्हणून या जागेचा विकास केला गेला असल्याने राहण्याखाण्याच्या सोयी चांगल्या आहेत. जाण्यासाठी चांगला काळ म्हणजे हिवाळा अथवा उन्हाळ्याची सुरवात. जंगल सफारीचा अनुभव घ्यायचा असेल तर या स्थळाला अवश्य भेट द्यावी.

Leave a Comment