कोलगेटका जवाब नहीं

नवी दिल्ली दि.१८ – गेल्या कांही दिवसात कच्चा माल, पॅकिंग, पेस्टमध्ये वापरण्यात येणारी तेले, सुगंधी द्रव्ये यांच्या किंमतीतील वाढीमुळे पेस्टच्या किंमतीही वाढल्या असल्या आणि तगडे प्रतिस्पर्धी या क्षेत्रात उतरत असले तरी कोलगेट पामोलिव्हने उद्योगात दोन आकडी वाढ नोंदविली असून सध्या तरी या ब्रँडला भारतात जवाब नाही असेच म्हणावे लागते आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे विश्लेषक आनंद गौर आणि गगन बोराणा याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की टूथपेस्ट उद्योगात २०१२ ते २०१५ या काळात १४ टक्के वाढ अपेक्षित आहे मात्र कोलगेट उद्योगात ही वाढ १७ टक्के दिसते आहे. ४५०० कोटी रूपयांच्या या उद्योगात कोलगेटचा वाटा ५४.३ टक्के इतका आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर, डाबर, जीएसके कंझ्युमर हेल्थकेअर या अन्य कंपन्या या स्पर्धेत आहेत. सध्या एकूणच ओरल केअर उत्पादनांत म्हणजे माऊथ वॉश, टूथब्रशेस या सारख्या वस्तूंच्या किंमती गेल्या पाच महिन्यात वाढल्या आहेत. ही वाढ ६ ते ७ टक्के आहे. मात्र या दरवाढीचा कोलगेटवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यांची विक्री वाढतेच आहे.

ग्रामीण भागात कोलगेटला मिळत असलेला प्रतिसाद हेही त्यामागचे कारण आहे. तेथील जनता आता टूथपावडर ऐवजी पेस्टकडे वळते आहे. या भागात पेस्ट वापरणार्यां चे प्रमाण ४२ टक्कयांवरून ५३वर गेले आहे आणि कोलगेट भारतात चांगली रूळलेली आणि तळागाळातील लेाकांना माहिती असलेले नांव असल्याने सध्या तरी त्यांचेच बाजारावर वर्चस्व आहे. प्रॅाक्टर गॅम्बल ने ओरल बी, क्रेस्ट ब्रँड टूथपेस्ट बाजारात आणून कोलगेटला स्पर्धा केली असली तरी सध्या तरी कोलगेट त्यांच्या खूपच पुढे असल्याचे सध्या तरी कोलगेटच्या विक्रीला लगाम घालणे कोणत्याच कंपनीला शक्य होईल असे वाटत नाही असेही ते म्हणाले.