मिट रोम्नींचा मास्क घालून लुटली बँक

वॉशिंग्टन दि.१८ – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी यांना पराभव पत्करावा लागल्याचे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मात्र याच मिट रोम्नींचा मास्क घालून एका दरोडेखोराने बँक लुटल्याची घटना नुकतीच घडली.

मिट रोम्नी यांचा मास्क घालून आलेल्या या सशस्त्र चोरट्याने व्हर्जिनिया वेल्स फार्गो बँक लुटली. वॉशिग्टनच्या उपनगरात असलेली ही शाखा चोरट्याने अचूक हेरून शस्त्राच्या धाकावर बँकेत प्रवेश केला आणि बॅकेतील पाचही टेलर मशीनमधून पैसे गोळा करून पोबारा केला. या दरोडेखोराने फ्लोरिडा स्टेटचा स्वेटशर्ट घातला होता. बँक लूटून पळून जाण्यातही तो यशस्वी ठरला. नंतर पोलिसांनी बँकेच्या मागेच असलेल्या पार्टी सिटी स्टोअर या दुकानात चौकशी करून रोम्नी यांचा मास्क नुकताच कुणाला विकला होता का याची चौकशी केली असेही समजते.

२०१०च्या डिसेंबरमध्ये असाच हिलरी क्लींटन यांचा मास्क वापरून याच बॅकेच्या स्टर्लिंग व्हर्जिनिया शाखेत असाच चोरीचा प्रयत्न केला गेला होता असेही समजते.