महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्यात पुणे दुसरया क्रमांकावर

पुणे दि.१८ – महिलांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याच्या घटनांत महाराष्ट्रात सातत्याने वाढ होत चालली असून त्यामुळे महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित राज्य बनले आहे. त्यातही अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात पुणे शहर राज्यात दुसरया  क्रमांकावर असून एकेकाळी महिलांसाठी सुरक्षित असलेले हे शहर आता अशा गुन्ह्यांचा अड्डाच बनत चालले असल्याचे राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मुंबईच्या राज्यात अशा गुन्ह्यांच्या प्रमाणात पहिला क्रमांक आहे. एकीकडे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले असताना या गुन्ह्यांबाबत शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र घटत असून ही चिंतेची बाब असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत.

गुन्हा अन्वेषण विभागाने २०११ साठीचा जो अहवाल सादर केला आहे, त्यानुसार महिलांवर बलात्कार, खून, विनयभंग आणि अपहरण अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे वाढत असून मुंबईत अशा २२१ घटना घडल्या आहेत तर पुण्यात ही संख्या १०४ आहे. २०१० च्या तुलनेत महिलांसंबंधात होणारे गुन्हे १५ टक्कयांनी घटल्याचे दिसत असले तरी गंभीर गुन्हांचे प्रमाण मात्र चिंताजनकरित्या वाढले आहे.

पुण्यातील गुन्ह्यांच्या संख्येबाबत माहिती देताना पुणे गुन्हे अन्वेषण विभाग उपायुक्त राजेश बनसोडे म्हणाले की पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी अनेक उपाय योजले असून दिवसा व रात्रीची गस्त वाढविली आहे. मात्र गुन्ह्यांची संख्या वाढलेली दिसते त्यामागे लोकामध्ये झालेल्या जागृतीमुळे पोलिसांत तक्रार देण्याचे वाढलेले प्रमाण हेही कारण आहे. पोलिसांनी महिलांसाठी स्वतंत्र सेल व हेल्पलाईन सुरू केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रेमप्रकरणातून खूनाच्या घटनांत १०.८ टक्के, वेश्याव्यवसायास लावणे प्रकारात २७.५ टक्के, अपहरण ११.४ टक्के, हुंडा प्रकरणात १० टक्के, बलात्कार ६.४ तर विनयभंगांच्या गुन्ह्यात ३.६ टक्के वाढ झाली असल्याचे त्यांनी मान्य केले. लैंगिक अत्याचार आणि विनयभंग प्रकरणात शिक्षा होण्याचे प्रमाण ५.४ व ७.५ टक्के आहे.

शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असण्यामागे साक्षीदार न मिळणे, पुरेसा पुरावा गोळा न करताच केस दाखल करणे, आरोपींची ओळख न पटवता येणे, वॉरंट योग्य तर्हेाने बजावली न जाणे, प्रलंबित केसेसची वाढती संख्या अशी अनेक कारणे असल्याचेही बनसोडे यांनी सांगितले.