सिगरेट पिणे आरोग्यास हानीकारक आहे हा संदेश सतत दिला जात असतो आणि सर्व लोकांना सिगरेट पिणे वाईट आहे हे माहितीही असते. पण म्हणून काही सिगरेट पिणार्यांंची संख्या कमी होत नाही. सगळ्यात उच्छाद असतो तो सिगरेटी पिऊन लोक थोटके रस्ताभर टाकून घाण करतात त्याचा. शहरी विभागात थोटकांची समस्या तीव्र असली तरी ही थोटके पक्ष्यांना वरदान ठरतात असे आढळून आले आहे. थांबा! ही गोष्ट भारतातली नाही तर ती आहे मेक्सिको मधली.
मेक्सिको मधील पक्षीनिरीक्षकांना पक्ष्यांची घरटी तपासली असता असे आढळले की सिगरेट ओढून फेकलेली थोटके या पक्षांना वरदान होत आहेत.पक्षी मुळात बुद्धिमान असतात यात शंका नाहीच. पक्षी निरीक्षकांनी चिमण्यांची घरटी तपासली तेव्हा त्यांना आढळले की या चिमण्या सिगरेटची थोटके आपल्या घरट्यात आणतात कारण त्यामुळे घरट्यातील पिलांना सेल्युलोजचे लायनिंग असलेले मऊ घरटे मिळतेच पण सिगरेटमधील निकोटीनमुळे बारीक सारीक किडे, वाळवी नष्ट होते. शहरातील वातावरणातही पक्षी स्वतःला अॅडॉप्ट करून घेतात.
नॅशनल ऑटोनॉमस विद्यापीठाने कॉन्स्टॅन्टिनो मासिआ यांच्या नेतृत्त्वाखाली हे संशोधन केले. त्यात त्यांनी ५७ घरटी तपासली. चिमण्यांच्या घरट्यात सरासरी ३८ थोटके आढळली. दर घरट्यात सरासरी आठ थोटके होती. ग्रामीण भागातील घरट्यांत मात्र पक्षी प्रतिकारक शक्ती वाढविणारी तीव्र सुगंधी वासाची झुडपे घरट्यातील आवरणासाठी निवडतात. तंबाखूचा निकोटीन हा बाय प्रॉडक्ट किडनाशक म्हणून वापरला जातो. पोल्ट्री पॅरासाईट नियंत्रणासाठीही निकोटिन वापरले जाते. पण माणसाप्रमाणेच पक्षीही निकोटिनचा उपयोग जाणतात हे विशेष.