सुंदर समुद्रकिनार्‍यांचे गोकर्ण महाबळेश्वर

गोकर्ण म्हणजे गायीचा कान. कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातले दोन नद्यांच्या मिलनातून कानासारखा आकार निर्माण झालेल्या ठिकाणी वसलेले गोकर्ण महाबळेश्वर हे हिंदू धर्मियांचे पवित्र स्थळ म्हणून जसे प्रसिद्ध आहे तसेच येथल्या सुंदर सम्रुद्रकिनार्‍यांसाठी पर्यटकांचेही आवडते स्थळ आहे. गोकर्णला गोव्यातून जसे जाता येते तसे अन्य ठिकाणांहूनही जाता येते. एका बाजूला पश्चिम घाटाचा डोंगरी भाग व दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यातून जाणारी गोकर्णची वाट पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालते.
karnataka-gokarna
गोकर्णला पाहायचे ते महाबळेश्वर मंदिर आणि महागणपती मंदिर. मुख्य रस्त्याच्या पश्चिम टोकाला असलेले महाबळेश्वर हे शिवमंदिर अतिशय सुंदर आणि भव्य आहे. येथे शंकराचे आत्मलिंग किवा अमृतलिंग पिंडस्वरूपात आहे आणि गाईच्या कानाच्या आकारात आत हे लिंग आहे. बाहेरून पाहताना याचे स्पष्ट दर्शन अवघड होते हे खरे पण या मंदिरामागची कहाणी अतिशय सुंदर आहे.

karnataka-gokarna1

असे सांगितले जाते की रावण मोठा शिवभक्त होता. शंकराची आराधना करून कडक उपासना करून त्याने शंकराला प्रसन्न करून घेतले. शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला तुला काय देऊ असे विचारले तेव्हा रावणाने शंकराला आत्मलिंग मागितले. आत्मलिंग ज्याच्याजवळ त्याला मृत्यूचे, पराभवाचे भयच नाही. भोळ्या सांबांनी आपले आत्मलिंग रावणाला दिले पण एक अट घातली की लंकेत पोहोचेपर्यंत हे लिंग जमिनीवर टेकवायचे नाही. रावण आत्मलिंग तळहातावर घेऊन आकाशमार्गे लंकेकडे निघाला. पण त्यामुळे देवलोक चिंतेत पडले. आता रावण अजिंक्य होणार. कांहीतरी करून लिंग परत आणले पाहिजे. शेवटी गणपतीने हे आव्हान स्वीकारले. समुद्रकिनार्‍यांवर तो गुराखी होऊन आला.रावणाच्या मार्गातच हे ठिकाण होते. दरम्यान रावणाला लघुशंका आली. पण लिंग जमिनीवर ठेवायचे नाही आणि लिंग हातात असताना लघुशंका करणार कशी? त्याला मोठा प्रश्न पडला तोपर्यंत गुराखीरूपातला गणपती त्याला दिसला.
karnataka-gokarna3
रावण खाली उतरला आणि गुराख्याला थोड्यावेळासाठी लिंग सांभाळायला सांगितले तेव्हा गुराखी म्हणाला तीन म्हणायच्या आत आला नाही तर मी हे लिंग येथेच ठेवून जाईन. रावणाने अट मान्य करून तो लघुशंकेसाठी गेला. हे पाहताच गणपतीने तीन आकडे मोजले आणि लिग गाईच्या कानात ठेवले. घाईघाईने परत येऊन रावणाने ते लिंग घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा गाय जमिनीत अदृष्य झाली पण तिचा कान रावणाच्या हातात आलो तो जमिनीत रूतला. रावणाला तो बाहेर काढता आला नाही आणि शेवटी आत्मलिंग गाईच्या कानात तसेच राहिले. तेथेच भव्य शिवमंदिर उभारले गेले. या मंदिराजवळच हुषारीने आत्मलिंग परत मिळविणाऱ्या गणेशाचे महागणपती मंदिरही आहे. दरवर्षी हजारो भाविक या स्थानाला भेट देत असतात. येथेच श्राद्धविधीही केले जातात.
karnataka-gokarna2
गोकर्णला पाच बीच आहेत आणि डोंगरावरून पाहिले असता हाताची पाच बोटे पसरावीत तसे हे किनारे दिसतात. सर्वात प्रमुख असलेला ॐ किनारा प्रेक्षणीय. हिंदू धर्मियात अतिशय पवित्र मानले जाणारे ॐ  चिन्हाच्या आकाराचा हा किनारा, निळाशार समुद्र डोळ्यांना पुरेपूर तृप्त करतात. येथे जाण्यासाठी चांगला काळ म्हणजे आक्टोबर ते फेब्रुवारीचा.राहण्यासाठी अनेक लॉज आणि धर्मशाळा आहेत. जेवणाखाण्याच्याही सोयी चांगल्या आहेत. तेव्हा एकदा गोकर्ण महाबळेश्वरला नक्की भेट द्या.

1 thought on “सुंदर समुद्रकिनार्‍यांचे गोकर्ण महाबळेश्वर”

Leave a Comment