ख्रिसमस तयारीसाठी दिला जाणारा वेळ

परदेशात सतत कांही ना कांही सर्वेक्षणे केली जातात. या संशोधनातून हाती येणारी माहिती बरेच वेळा मनोरंजक असते तर बरेच वेळा ती उपयुक्तही ठरते. आता हेच पहा. पाश्चात्य देशातला वर्षातला सर्वात मोठा सण ख्रिसमस आता कांही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाच्या तयारीसाठी ब्रिटीश लोक सरासरी १२ दिवस १४ तास आणि १३ मिनिटे इतका वेळ खर्च करतात असे एका संशोधनातून निष्पन्न झाले आहे.

वर्षातला हा मोठा सण सर्व दृष्टीने आनंदाचा असावा आणि परिपूर्ण असावा अशी प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते. ब्रिटीश कटुंबे या सणासाठी येणार्या  खर्चाची तरतूद ऑगस्टपासूनच पैसा बाजूला टाकून करतात. सात पैकी १ कुटुंब सेलमध्येच या सणासाठीची खरेदी करण्यास प्राधान्य देतात मात्र बहुतेक जण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सणासाठीची खरेदी करतात असेही या संशोधनात दिसून आले.२००० कुटुंबांच्या मुलाखती या संशोधनासाठी घेण्यात आल्या होत्या.

संशोधनातील आकडेवारीनुसार सणासाठी काय खरेदी करायची याचा शोध घेण्यात ९ दिवस १५ तास ४८ मिनिटे खर्च केली जातात. पुडचे तीन तास २६ मिनिटे प्रत्यक्ष शॉपिंगसाठी जातात. ख्रिसमस कार्ड लिहीणे, गिफ्ट पॅकींगसाठी २ तास २१ मिनिटे खर्च होतात. घराभोवतीचे डेकोरेशन करण्यासाठी ३ तास ६ मिनिटे खर्च केली जातात तर कोणते डेकोरेशन करायचे, जेवणात काय करायचे, भेटी कोणत्या घ्यायच्या याचे प्लॅनिंग आणि विचार करण्यासाठी सरासरी २ दिवस १० तास ४८ मिनिटे खर्च केली जातात. प्रत्यक्ष जेवण बनविण्यासाठी मात्र २ तास ३४ मिनिटे लागतात असेही या संशेाधनातून निष्पन्न झाले.

ख्रिसमसचा हा सण पाश्चात्य आणि जगभरातील ख्रिश्चन समुदायासाठी महत्वाचा सण असतो आणि या सणाला मोठी परंपराही आहे. त्यामुळे कितीही ताणतणाव असले तरी हा सण आनंदाचा व्हावा असाच प्रत्येक कुटुंबाचा प्रयत्न असतो असेही दिसून आले आहे.