‘बारा’मतीचे महाराष्ट्राला देणे

श्री. शरद पवार यांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाच्या अनुरोधाने गतवर्षी आपली मालमत्ता जाहीर केली. ती बारा कोटी रुपयांची असल्याचे त्यांनी प्रसिद्ध केले. त्यांची ती मालमत्ता बाराच कोटीची कशी, असा प्रश्न बर्यातच जणांनी विचारला. परंतु शरद पवार हे ‘बारा’मतीचे आहेत. ते बारा तारखेला बाराव्या महिन्यात जन्माला आलेले आहेत. बारामती या शब्दात मती हा शब्द नेहमीच दुलर्क्षित राहतो. परंतु माणसासाठी मती फार महत्वाची असते. कारण मती म्हणजे बुद्धी. या मतीच्या जोरावरच बारामतीच्या शरद पवारांनी दिल्ली काबीज केली आणि आज ते केंद्र सरकारची सूत्रे हलवणार्याे मोजक्या नेत्यांपैकी एक झालेले आहेत.

शरद पवार यांच्या वाढदिवसा दिवशी आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. कारण महाराष्ट्राला अशा नेत्याची नितांत गरज आहे. महाराष्ट्राचा एखादा प्रश्न आपणच मनावर घेतला पाहिजे आणि त्यासाठी काही उपाय शोधण्यासाठी शोधक नजरेने सर्वत्र पाहिले पाहिजे असे पवारांना मनापासून वाटते. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत की नसोत ते आपल्याला महाराष्ट्राचा नेता मानतात आणि राज्याच्या प्रश्नासंबंधी नेहमीच चिंता करतात. त्यांच्यातला नेतृत्व गुण  आणि विकासाचा दृष्टीकोन त्यांना गप्प बसू देत नाही. त्यांची ती खासीयत आहे. ते अधुन मधुन परदेश दौरे करतात तेव्हा ते परदेशात अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून पहात असतात.

नुकताच पुण्यामध्ये महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या साहित्य संमेलनाचा समारोप झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये केवळ तात्विक विवेचन केले नाही, वेळ मारून नेणारे भाषणही केले नाही किवा अशा समारंभात करावयाच्या निव्वळ औपचारिक भाषणासारखेही भाषण त्यांनी केले नाही. आपल्याला महाराष्ट्राच्या खर्या  प्रश्नांविषयी किती सखोल जाण आहे याचे प्रत्यंतर आणून देणारे भाषण त्यांनी केले. या भाषणात त्यांनी महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाचा आणि कृषी विकासाचा विचार मांडलामहाराष्ट्राला आज भेडसावत असलेल्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी ज्येष्ठ भूशास्त्रज्ञ डॉ. सुरेश खानापुरे यांनी धुळे जिल्हयात राबवलेल्या जलसंधारणाचा प्रयोग साऱ्या महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न करणार असे ते म्हणाले.

धुळे जिल्हयात आमदार अमरीशभाई पटेल यांच्या प्रेरणेने श्री.  खानापुरे यांनी केलेला प्रयत्न फार अनमोल आहे. पाण्याच्या टंचाईवर चर्चा करणारे आाणि चिंता व्यक्त करणारे नेते अनेक आहेत पण या टंचाईवर खानापुरे यांनी केलेल्या प्रयोगाची दखल घेणारे नेते या महाराष्ट्रात किती आहेत, याचा शोधच घ्यावा लागेल. शरद पवार यांनी मात्र या प्रयोगाची दखल घेतली आहे. एवढेच नव्हे तर त्याचे कौतुक करून तो प्रयोग महाराष्ट्रभर करण्याची कल्पना मांडली.

श्री. पवार यांनी या कार्यक्रमात बोलताना यूरोपीय आणि भारतीय लोकांच्या मनोवृत्तीची तुलना केली. यूरोपातले लोक कोणत्याही नव्या संशोधनाला विरोध करीत नाहीत. आपल्या देशात मात्र कोणत्याही नव्या प्रयोगाला विरोध कसा करता येईल याचाच विचार सुरू असतो. एकमेकांचे पाय ओढण्याची प्रवृत्ती आपल्या समाजात फार मोठया प्रमाणावर आहे, असे ते म्हणाले. श्री. पवार यांच्यासारखे ज्येष्ठ कार्यकर्तेच समाजामधील वाईट प्रवृत्तीवर इतक्या नेमक्यापणाने बोट ठेवू शकतात. हा त्यांच्या दृष्टीकोनाचा आणि अनुभवाचा परिणाम असतो. 

आजच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांचाही वाढदिवस आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांच्या खालोखाल लोकप्रियता मिळविलेला आणि सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणाची तार छेडण्याची क्षमता असणारा नेता म्हणून गोपीनाथराव मुंडे यांचाच उल्लेख आवर्जून केला जातो. घराण्यामध्ये राजकारणाची कसलीही परंपरा नसताना धाडसी स्वभाव आणि समाजामध्ये आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ते परिश्रम करण्याची तयारी याच्या जोरावर मुंडे यांनी हे यश प्राप्त केलेले आहे. श्री. शरद पवार यांच्या प्रमाणेच मुंडे यांचीही वाटचाल अनेक चढ-उतारांनी भरलेली आहे. परंतु आयुष्यात जेव्हा प्रतिकूल काळ येतो तेव्हा डगमगून न जाता आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची धीरोदात्त वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे ते सगळ्या संकटातून आपली वाटचाल सुरू ठेवत आलेले आहेत. महाराष्ट्राला अजूनही गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावे, अशी दैनिक ‘मराठवाडा नेता’ची शुभकामना आहे.

तमिळनाडूतील चित्रपट अभिनेता रजनीकांत यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांचे अभिष्टचिंतन आपण करण्याची गरज काय, असा प्रश्न कोणाच्या मनामध्ये साहजिकच उपस्थित होऊ शकतो. परंतु रजनीकांत  यांनी तमिळ चित्रपटसृष्टी गाजवलेली असली तरी मुळात ते मराठी भाषक आहेत. त्यांचे मूळ नाव शिवाजी गायकवाड असे आहे. ते पोट भरण्यासाठी म्हणून तामिळनाडूत गेले आणि तिथे सुरुवातीच्या काळात बस कंडक्टर म्हणून नोकरी केली. मात्र हळू हळू तमिळ भाषा शिकून आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी चित्रपट सृष्टीतला शिवाजी होण्याचा मान मिळवला.

Leave a Comment